Video : 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं मराठी प्रेम! हिंदीत बोलण्याची विनंती करताच आमिर खान म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:28 IST2026-01-15T19:28:13+5:302026-01-15T19:28:46+5:30
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याने पत्रकाराला दिलेल्या एका उत्तराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Video : 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं मराठी प्रेम! हिंदीत बोलण्याची विनंती करताच आमिर खान म्हणाला...
Aamir Khan Marathi Language Viral Video : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकासाठी आज मतदान पार पडलं आहे. मुंबईत अनेक सेलिब्रिटी मंडळीही आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाली. अशातच अभिनेता आमिर खानही त्याचे मत देऊन बाहेर आला. तेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडली, जी सध्या तुफान व्हायरल होतेय.
आमिर खाननेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमिरने जे विधान केले, त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी आमिर मराठीत बोलत होता. आमिरला मराठीत बोलताना पाहून एका पत्रकाराने त्याला विनंती केली, "सर, कृपया हिंदीतही बोला (देशासाठी)". यावर आमिरने क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं, "हिंदीत कशाला? हा महाराष्ट्र आहे भाऊ". आमिरचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले. जेव्हा पत्रकाराने त्याला पुन्हा सांगितले की, हा व्हिडीओ दिल्लीसह देशभरातील प्रेक्षक पाहत आहेत, तेव्हा आमिरने हसून हिंदीतही आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी आमिरनं मुंबई महानगरपालिकेच्या व्यवस्थेचेही कौतुक केले.
आमिर खानचा हा व्हिडओ समोर येताच नेटकऱ्यांमध्ये भाषेवरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी आमिरच्या "हा महाराष्ट्र आहे भाऊ" या विधानाचे समर्थन केले असून, महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य दिले पाहिजे, अशा कमेंट्स केल्या आहेत. मतदानाच्या दिवशीच आमिरने दाखवलेल्या या मराठी प्रेमामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, आमिर हा मराठीमधून संवाद साधण्याचा कायम प्रयत्न करत असतो. ४४ व्या वर्षी मराठीचे धडे घेतल्याचं त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'सितारे जमीन पर'चित्रपटात दिसला होता. तसेच उद्या त्याचा 'हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे.