प्रणित मोरेनं आई-वडिलांसाठी घेतलेल्या घराची झलक आली समोर, नेमप्लेटने जिंकली मनं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:21 IST2025-12-28T17:21:08+5:302025-12-28T17:21:37+5:30
'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

प्रणित मोरेनं आई-वडिलांसाठी घेतलेल्या घराची झलक आली समोर, नेमप्लेटने जिंकली मनं!
'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणित मोरेची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. तीन महिने 'बिग बॉस १९' गाजवलेल्या 'स्टँडअप कॉमेडियन' प्रणितचा देशभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झालाय. प्रणितबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. प्रणितने मुंबईत आई-वडिलांसाठी घेतलेल्या घराची झलक समोर आली आहे.
प्रणितने 'बिग बॉस'च्या घरात असताना आपल्या कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. एकेकाळी आर्थिक संकटामुळे प्रणितच्या कुटुंबाला स्वतःचं घर विकावं लागलं होतं. त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने त्यांना कोकणातील त्यांच्या गावी रत्नागिरीत घर बांधून द्यावं. मात्र, आई-वडील आपल्या जवळच राहावेत यासाठी प्रणितने मुंबईत घर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं. अशातच 'Solace Studio' च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रणितच्या या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

प्रणितनं स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून हे घर खरेदी केलंय. त्यानं अत्यंत आकर्षक इंटेरिअर घराचं करुन घेतलं आहे. घराचा हॉल अतिशय मोठा असून त्यात एक छोटेखानी पण सुंदर देवघर बनवण्यात आलं आहे. घराचं रंगकाम आणि फर्निचरमध्ये आधुनिकतेचा टच आहे. तर हॉलमध्ये आकर्षक सोफे आणि सजावटीच्या वस्तू ठेवल्या आहेत. प्रणितच्या या घराची सर्वात खास गोष्ट म्हणजे दारावर असलेली नेमप्लेट. प्रणितने हे घर आपल्या आई-वडिलांसाठी घेतल्यामुळे त्याने दारावर त्यांच्या नावांची 'सत्यवान मोरे आणि वनिता मोरे' अशी आकर्षक नेमप्लेट लावली आहे. हे पाहून चाहते प्रणितचं कौतुक करत आहेत.