एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:37 IST2025-10-08T07:37:12+5:302025-10-08T07:37:23+5:30
आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा शेट्टीची चौकशी

एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीची चार तास चौकशी करत तिचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी तिने दिलेली माहिती तसेच कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात शनिवारी शिल्पाच्या निवासस्थानी पार पाडल्याचे अधिकारी म्हणाले. खासगी वित्तीय संस्थेचे संचालक दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार, २०१६ साली राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी ‘बेस्ट डील टीव्ही’ या कंपनीत गुंतवणुकीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यात ७५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचे आश्वासन देत, नियमित परताव्याचेही आश्वासन त्यांना दिले. कोठारी यांनी दोन टप्प्यांत एकूण ६०.४८ कोटी रुपये गुंतवले. मात्र गुंतवणुकीनंतर शिल्पा शेट्टी यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ही कंपनी दिवाळखोरीत निघाली, अशी माहिती कोठारी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, कुंद्रा यांनी वेळोवेळी कारणे देत पैसे परत देण्यास टाळटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात राज कुंद्रा दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
काय सांगितले शिल्पाने?
कंपनीसाठी आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी आपल्याकडे नव्हती. एक सेलेब्रिटी म्हणून या कंपनीसोबत जोडले गेले आणि त्याचे मानधन मला मिळाले. त्या व्यतिरिक्त कंपनीशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा शिल्पाने चौकशीदरम्यान केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.