Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
By कोमल खांबे | Updated: January 11, 2026 13:56 IST2026-01-11T13:55:15+5:302026-01-11T13:56:55+5:30
अमित ठाकरेंना महेश मांजरेकरांकडून एका सिनेमासाठी ऑफर होती असा गौप्यस्फोटही अमित ठाकरेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला.

Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
सध्या राज्यात सगळीकडेच महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या महापालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही प्रचार करताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने अमित ठाकरेंनी लोकमतशी खास संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी काही गोष्टींचा खुलासादेखील केला. अमित ठाकरेंना महेश मांजरेकरांकडून एका सिनेमासाठी ऑफर होती असा गौप्यस्फोटही अमित ठाकरेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला.
अमित ठाकरेंना या मुलाखतीत राजकारण नसतं तर कोणत्या क्षेत्रात जायला आवडलं असतं? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना अमित ठाकरेंनी कलाक्षेत्रात किंवा खेळात काहीतरी करायला आवडलं असतं असं सांगितलं. त्याचवेळी अमित ठाकरेंनी महेश मांजरेकरांनी सिनेमाची ऑफर दिली होती, असा खुलासादेखील केला. ते म्हणाले, "मला महेश मांजरेकर सरांनी त्यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमासाठी विचारलं होतं. पण, राजकारण हे पूर्ण वेळ करण्याचं काम आहे. ते सोडून मला वेगळं काही करता येणार नाही. हे दोन्ही क्षेत्र असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला १०० टक्के द्यायला लागतात. ५०-५० टक्के देऊन चालत नाही".
दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या सिनेमातून शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं होतं. सिनेमात सिद्धार्थ बोडकेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मध्ये सयाजी शिंदे, बालकलाकार त्रिशा ठोसर, शशांक शेंडे, मंगेश देसाई, सांची भोयर अशी स्टारकास्ट होती.