"गेल्या ११ वर्षांपासून कमिटेड रिलेशनमध्ये", प्रेमाची कबुली देत अक्षया नाईकने शेअर केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:14 IST2025-05-29T16:03:06+5:302025-05-29T16:14:26+5:30
अभिनेत्रीनं गेल्या ११ वर्षांपासून एका कमिटेड रिलेशनमध्ये असल्याचं सांगतं प्रेमाची कबुली दिली आहे.

"गेल्या ११ वर्षांपासून कमिटेड रिलेशनमध्ये", प्रेमाची कबुली देत अक्षया नाईकने शेअर केला VIDEO
Akshaya Naik Confesses Her Love: अक्षया नाईक (Akshaya Naik) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तिने मराठीबरोबरच हिंदी टेलिव्हिजनचा पडदादेखील गाजवला आहे. अक्षयाने हिंदीतील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्येही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे अभिनेत्रींचं 'झिरो फिगर' आणि 'सुडौल व्यक्तिमत्त्व' असावं ही इमेज ब्रेक करणाऱ्या काही मोजक्या अभिनेंत्रीपैकी अक्षया ही एक आहे. त्यामुळे अक्षयाचा चाहतावर्गही खास आणि मोठा आहे. त्यांना तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते. अशातच आता अभिनेत्रीनं गेल्या ११ वर्षांपासून एका कमिटेड रिलेशनमध्ये असल्याचं सांगतं प्रेमाची कबुली दिली आहे.
अक्षयानं एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिनं स्कूटीसोबत रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलंय. तिच्या स्कूटीचं नाव 'मिस्टर रँचो' असं आहे. व्हिडीओत ती म्हणते, "बऱ्याच जणांना माहिती नाही पण मी गेली ११ वर्ष एका कमिटेड रिलेशनमध्ये आहे. आणि मी ही न्यूज आता ब्रेक करत आहे. आज खूप महिन्यांनी आमची भेट झाली आहे. आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. जास्त वेळ न घालवता मला माझ्या कॉन्स्टंटसोबत वेळ घालवू द्या".
अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहलं, "रँचो सोबत ११ वर्षे कधी गेली, कळलंच नाही. बहिणीने दिलेली एक छोटीशी भेट आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग बनून गेली. रँचोनं सगळं पाहिलंय… अगदी लॉग राईड, नियम मोडणारे कॉलेजमधले दिवस, मित्रांसोबतचे खास क्षण आणि जेव्हा फक्त स्वतःसाठी वेळ हवा असायचा, तेव्हा एकटीने शांतपणे केलेल्या प्रवास. रँचो ही फक्त माझी गाडी नाही, तर माझं स्वातंत्र्य, माझा मोकळा श्वास आणि माझा साथीदार. आताही त्याला सुरू करताना मला पुन्हा एकदा जुन्या सुंदर आठवणीत परत गेल्याचं वाटतं. काही नात्यांना शब्दांची गरजच नसते, तसंच नातं माझं रँचोसोबतचं आहे".
अक्षया ही सोशल मीडियावर सक्रीय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिनं 'सावधान इंडिया', 'बिग एफ', 'मेरे रंग में रंगने वाली' या मालिकांमध्येही काम केलं आहे. उत्तम अभिनयक्षमता असलेली अक्षया ही उद्योजिकादेखील आहे. अक्षया मुळची गोव्याची आहे. त्यामुळे तिनं मायभूमीमध्ये बहिणीच्या साथीने पर्यटकांसाठी होम स्टेची सोय केली आहे. पणजीपासून ८ किलोमीटर अंतरावर अक्षयाचं घर आहे. याच घराचं रुपांतर आता तिने होम स्टेमध्ये केलं आहे. या होम स्टेला अक्षयाने 'नाईक होम स्टे' असं नाव दिलं आहे.