"परेश रावल यांना मी.."; अक्षय कुमार 'हेरा फेरी ३'च्या वादावर पहिल्यांदाच झाला व्यक्त, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:26 IST2025-05-27T15:24:55+5:302025-05-27T15:26:57+5:30
अक्षय कुमारने आज हाउसफुल्ल ५ च्या इव्हेंटमध्ये हेरा फेरी ३ च्या वादावर आणि परेश रावल यांच्याविषयी पहिल्यांदाच वक्तव्य केलं

"परेश रावल यांना मी.."; अक्षय कुमार 'हेरा फेरी ३'च्या वादावर पहिल्यांदाच झाला व्यक्त, काय म्हणाला?
गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे ते म्हणजे 'हेरा फेरी ३'. परेश रावल यांनी (paresh rawal) 'हेरा फेरी ३' सोडला आणि सगळीकडे वाद निर्माण झाला. याविषयी सुनील शेट्टीने त्याच्या भावना व्यक्त केल्या पण अक्षय कुमार (akshay kumar) मात्र इतके दिवस काही बोललाच नव्हता. आज मुंबईत 'हाउसफुल्ल ५'चा जो इव्हेंट झाला, त्या इव्हेंटमध्ये अक्षय कुमारला याविषयी विचारलं असता अभिनेत्याने मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला?
'हेरा फेरी ३' वादावर अक्षय कुमार पहिल्यांदाच झाला व्यक्त
'हाउसफुल्ल ५'च्या ट्रेलर लाँचला अक्षय कुमारला 'हेरा फेरी ३'विषयी विचारलं असता अभिनेत्याने मोजकंच उत्तर देऊन त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. अक्षय म्हणाला, "माझ्या सह-कलाकाराला मुर्ख म्हणणं चुकीचं आहे. मी त्यांच्यासोबत गेली ३२ वर्ष काम करतोय. ते खूप कमाल अभिनेते आहेत. मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो आहे. जे काही झालंय त्याविषयी इथे बोलणं योग्य नाही. हा खूप गंभीर मुद्दा आहे त्यामुळे कोर्टात जे काही व्हायचं ते होईल. मी या मंचावर याविषयी बोलणार नाही." परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यावर त्यांना सोशल मीडिया युजर्स त्यांना मुर्ख म्हणत आहेत, त्या मुद्द्यावर अक्षयने बोट ठेवलं.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' का सोडला?
आयएनएसच्या रिपोर्टनुसार, परेश रावल यांच्या वकिलांनी सांगितले की, "परेश रावल यांना सिनेमाची गोष्ट, स्क्रीनप्ले आणि एक लांबलचक ड्राफ्ट मिळालाच नाही जो त्यांच्यासाठी फार गरजेचा होता. याच कमतरतेमुळे त्यांनी सिनेमा सोडला. तसंच ओरिजनल सिनेमाचे निर्माते नाडियादवाला यांनी परेश रावल यांना नोटीस पाठवून सिनेमावर आक्षेप घेतल्यानेही त्यांनी प्रोजेक्ट सोडला. तसंच व्याजासकट पैसेही परत केले. त्यांनी टर्म शीट (सुरुवातीचा कॉन्ट्रॅक्ट) सुद्धा रद्द केला आहे." ही गोष्ट त्यांनी फिरोज नाडियादवाला यांना उद्देशून सांगितली. तसंच आपसी संबंधांवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी सिनेमापासून लांब राहणं पसंत केलं.
परेश रावल यांनी दिलं कायदेशीर उत्तर
परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर लिहिलं की, "माझे वकिल अमीत नाईक यांनी माझ्या त्या निर्णयाबाबत योग्य उत्तर पाठवले आहे. एकदा ते वाचल्यावर सर्व प्रश्न मिटतील." अक्षय कुमारच्या 'केप ऑफ गुड फिल्म्स' या निर्मिती संस्थेने परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला आहे. या दाव्याचे कारण म्हणजे, परेश रावल यांनी करारावर स्वाक्षरी करूनही 'हेरा फेरी ३' सिनेमातून बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाले आहे. त्यावर परेश रावल यांनी कायदेशीर उत्तर पाठवलं आहे.