ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:55 IST2025-08-17T13:53:55+5:302025-08-17T13:55:46+5:30
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेजस्विनीची अत्यंत भावुक अवस्था झाली होती.

ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालंय. वयाच्या ६९ व्या वर्षी ज्योती यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती या सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत होत्या. ज्योती यांचं अकस्मात झालेलं निधन अनेकांना चटका लावून गेलं. आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची अत्यंत भावुक अवस्था झाली होती.
आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनीचे अश्रू अनावर
Abp माझाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. तेजस्विनीने आईला मुखाग्नी दिला. त्यावेळी आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनीची भावुक अवस्था झाली होती. तिने दोन्ही हात जोडून आईला श्रद्धांजली वाहिली. यावेळी तेजस्विनीच्या अश्रूंचा बांध फुटला होता. इंडस्ट्रीतील कलाकार आणि ज्योती यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. आईचं छत्र हरपल्याने अनेकांनी तेजस्विनीला धीर दिला.
'ठरलं तर मग' मालिकेतील पूर्णा आजींची भूमिका लोकप्रिय
ज्योती चांदेकर या सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजींची भूमिका साकारत होत्या. मालिकेतील भूमिकेतमुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. 'ठरलं तर मग' मालिकेतील कलाकारांना यामुळे मोठा धक्का बसला. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण काल दुपारी ४च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्यापैकी तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.