Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:21 IST2025-10-25T16:19:38+5:302025-10-25T16:21:00+5:30
Satish Shah Passes Away: हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचं कारण समोर

Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Satish Shah Death: मनोरंजनविश्वातून दु:खद बातमी आली आहे. टीव्ही आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. आज दुपारी २.३० वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते आणि किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. 'हम साथ साथ है', 'मै हूँ ना' ते टीव्हीवरील 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. उद्या २६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सतीश शाह यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते हिंदुजा रुग्णालयात दाखल होते. किडनी फेल झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. फिल्ममेकर अशोक पंडित यांनी व्हिडिओ शेअर करत सतीश शाह यांच्या निधनाची बातमी दिली. ते म्हणाले, "हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की आपला प्रिय मित्र आणि दमदार अभिनेता सतीश शाहचं काही तासांपूर्वीच किडनी फेल झाल्यामुळे निधन झालं आहे. हिंदुजा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्याने अंतिम श्वास घेतला. त्याच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे. ओम शांती."
VIDEO | Mumbai: Filmmaker Ashok Pandit on the passing of actor Satish Shah says, "My friend and great actor Satish Shah passed away due to kidney failure. His body will be brought to his residence in Bandra. It’s a big loss for our industry. I have worked a lot with him; he was a… pic.twitter.com/0GuXVUrUGp
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2025
सतीश शाह आपल्या विनोदी अभिनयासाठी लोकप्रिय होते. २५ जून १९५१ मध्ये त्यांचा जन्म झाला. पुण्यातील एफटीआयआय मधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. ८० दशकापासूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. नसीरुद्दीन शाह यांच्या 'जाने दो भी यारो' सिनेमात त्यांनी काम केलं. 'ये जो है जिंदगी' या मालिकेत त्यांनी ५५ एपिसोडमध्ये वेगवेगळ्या ५५ भूमिका केल्या. २००४ साली आलेली त्यांची 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिका खूप गाजली. त्यात त्यांची इंद्रवदन साराभाई ही भूमिका होती. सतीश शाह यांनी २०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 'हम साथ साथ है','कल हो ना हो','मै हूँ ना','चलते चलते','मुझसे शादी करोगे' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.