‘प्लॅनेट मराठी’विरोधात ७ कोटींच्या फसवणुकीची तक्रार, प्रकरण काय?
By संजय घावरे | Updated: February 6, 2025 05:46 IST2025-02-06T05:44:51+5:302025-02-06T05:46:07+5:30
Planet Marathi News: दुबईतील गुंतवणूकदार, मीडिया प्रोफेशनल आयुष शाह आणि ‘ताराराणी’ चित्रपटाच्या निर्मात्या दीपा त्रासी यांनीही प्लॅनेटवर खटला दाखल केला आहे.

‘प्लॅनेट मराठी’विरोधात ७ कोटींच्या फसवणुकीची तक्रार, प्रकरण काय?
-संजय घावरे
मुंबई : पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असलेले ‘प्लॅनेट मराठी’ कर्जबाजारी झाले असून माजी सहसंस्थांपकांनी सात कोटींची फसवणूक झाल्याची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच ३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आरोपही या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होत आहेत.
प्लॅनेट मराठीच्या माजी सहसंस्थापक सौम्या विळेकर यांनी ओटीटी चॅनेल तसेच संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्याविरोधात सात कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने तसेच अनेक पुरवठादारांना खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याबद्दल अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
याखेरीज दुबईतील गुंतवणूकदार, मीडिया प्रोफेशनल आयुष शाह आणि ‘ताराराणी’ चित्रपटाच्या निर्मात्या दीपा त्रासी यांनीही प्लॅनेटवर खटला दाखल केला आहे.
ओटीटी बनवण्याचा निर्णय घेतल्यावर मी ५० कोटींची गुंतवणूक आणली. मात्र नंतर त्यांचे वैयक्तिक खर्च वाढू लागले. चुकीच्या खर्चाला मी विरोध केला. त्यामुळे वाद निर्माण झाल्याने मी जुलै २०२३मध्ये प्लॅनेट मराठी सोडले. मित्र-नातेवाइकांकडून कंपनीसाठी घेतलेले ३ कोटी रुपयांचे पर्सनल लोन, दोन वर्षांपासून न घेतलेला पगार दीड-दोन कोटी रुपये, प्लॅनेट उभे करण्यासाठी नुकसानभरपाई पाच कोटी रुपये मागितले. मला सात कोटी रुपयांचे दिलेले चेक्स बाउन्स झाले. -सौम्या विळेकर
डिसेंबरमध्ये अक्षय बर्दापूरकरवर खटला दाखल केला आहे. त्यांना दोन समन्स पाठवण्यात आले आहेत. त्यांनी आमच्याकडून १ कोटी १४ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते. त्यापैकी ८७ लाख रुपये माझे आणि २० लाख रुपये माझी बहीण मौसम शाहचे आहेत. दोघांचेही चेक्स बाउन्स झाले. याबाबत अंधेरी एमआयडीसी पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. पैसे देत नसल्याने न्यायालयात खटलाही दाखल केला. आणखी २५ लाख रुपयांची सिव्हिल केसही दाखल करणार आहे. -आयुष शाह (संस्थापक, मार्स कम्युनिकेट्स)
माझ्यावरील आरोप खोटे आहेत. न्यायालयात आम्ही कायदेशीर बाबींना उत्तर देऊ. आम्ही सौम्याला एक रुपया देणे नसून, तिच्याकडून घेणे आहे. त्या विरोधात फौजदारी तक्रार करणार आहोत. -अक्षय बर्दापूरकर (संस्थापक, प्लॅनेट मराठी)