'संघर्षयोद्धा'चा १००% पूर्ण नफा हा मराठा समाजाला मदत म्हणून जाहीर, निर्माते गोवर्धन दोलताडेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 20:09 IST2024-06-18T20:08:40+5:302024-06-18T20:09:16+5:30
Sangharshyoddha Manoj Jarange Patil Movie : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाच्या टीमने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे.

'संघर्षयोद्धा'चा १००% पूर्ण नफा हा मराठा समाजाला मदत म्हणून जाहीर, निर्माते गोवर्धन दोलताडेंची घोषणा
१४ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाच्या टीमने आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. मला आनंद वाटतोय की एक खरा संघर्ष माझ्या लेखणीमधून आणि निर्मितीमधून राज्याच्या पुढे येतोय, असे देखील गोवर्धन दोलताडे बोलले. यावेळी पत्रकार परिषदेला सहनिर्माते रामदास एकनाथ मेदगे, जान्हवी मनोज तांबे , विठ्ठल अर्जुन पचपिंड, नितीन लोहोकरे व सर्वच चित्रपटाची टीम उपस्थित होती.
गोवर्धन दोलताडे म्हणाले की, या चित्रपटातून एक रुपया देखील कमविणे हा माझा हेतू नाही, उलट मला आनंद होईल की ह्या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय. जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्रामधील करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पाहावा, त्याचबरोबर ह्या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतली आहे. पण तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.
चित्रपटाला मिळतोय उदंड प्रतिसाद
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय. चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी म्हटले. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल असे वाटते. त्याचबरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल याच गोष्टीसाठी बनवलेला आहे असं अभिनेता रोहन पाटील यांनी मत व्यक्त केले.