शुद्ध देसी मराठी चॅनलच्या 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या मराठी वेब सीरिजची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ही वेब सीरिज तरूणाईच्या चांगलीच पसंतीस पडली असून यातील वेगवेगळे कलाकारांनाही पसंती मिळाली आहे.  या वेब सीरिजमधील 'कचरा बॉय' सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आलाय. ही भूमिका साकारलीय ठाणे शहरातील रमेश चांदणे या कलाकाराने.  

रमेश चांदणे हा अभिनेता आता  'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' वेब सीरिजमधून चर्चेत आला असला तरी त्याने अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्येही छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. पण या वेबसीरिजमधील कचरा बॉय हा वेगळ्या पद्धतीचा आहे. तो रॅप करतो आणि त्यातून लोकांना स्वच्छतेचा संदेश देतो. त्यामुळे त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष कधी संपत नसतो. मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये छोटी छोटी कामं करणारा हा कलाकार मात्र अजूनही उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो. कारण अभिनयाची कामं नेहमी मिळतीलच असं नाही. पण त्याचं यामागचं कारण म्हणजे अभिनयाला पुरेसा वेळ देता यावा म्हणून तो रिक्षा चालवतो.

‘रेगे’, ‘ठाकरे’, ‘डी’, 'रक्तचरित्र' अशा अनेक सिनेमांमध्ये काम करूनही त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नव्हती. पण 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या वेब सीरिजमधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून कचरा बॉयला चांगली फॅन फॉलोइंग मिळाली आहे. शुद्ध देसी मराठी या लोकप्रिय चॅनलने रिलीज केलेल्या 'माझ्या मित्राची गर्लफ्रेन्ड' या सहा एपिसोडच्या वेब सीरिजचे आतापर्यंत पाच एपिसोड रिलीज झाले आहेत. आणि तरूणाईकडून या वेब सीरिजला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

रमेश त्याच्या या अनोख्या प्रवासाबाबत सांगतो की, 'अभिनय हे प्राधान्य असले तरी रिक्षा हे पोट भरण्याचं आणि घर चालवण्याचं साधन आहे. मी नाटक, मालिका, चित्रपटात काम केले असले, तरी रिक्षा खरेदी करून ती चालवत असल्याचा मला अभिमानच वाटत आहे. मला रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटत नाही, असे रमेश यांनी सांगितले. 

शाळा, महाविद्यालयांपासूनच अभिनयाची त्यांना आवड होती. दिग्गज अभिनेते हे महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धांतूनच मोठे झाले, असे त्याला ऐकायला मिळायचे. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी नव्हे तर एकांकिका स्पर्धांत भाग घेण्यासाठी त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि अभिनयाचा त्याचा प्रवास सुरू झाला.

एखाद्या मालिका, चित्रपटात काम मिळाले, तरी ती मालिका बंद झाली किंवा चित्रपटाचे काम पूर्ण झाले, तर पुढे काम मिळेलच, याची शाश्वती नसते. मग, त्या कलाकाराला पोटापाण्याचा प्रश्न जाणवतो. रमेश यांनी कुटुंबासाठी अभिनयाकडे पाठ न फिरवता रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या वेगळेपणाचं कौतुकही प्रेक्षक करतात.

हिंदी-मराठी सिनेमात भूमिका

रमेशने आतापर्यंत ‘रक्तचरित्र-२’, ‘चलचले’, ‘अतिथी तुम कब आओगे’, ‘हॉस्टेल’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘ठाकरे’, ‘फोर्स’, ‘तेरे बिन लादेन-२’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत, ‘रेगे’, ‘जत्रा’, ‘नशिबाची ऐशीतैशी’, ‘भैरू पैलवान की जय हो’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’ अशा अनेक सिनेमात, ‘जाणूनबुजून’, ‘यदा यदा ही धर्मस्य’, ‘बुवा भोळा भानगडी सोळा’, ‘पहिली भेट’, ‘आम्ही पाचपुते’, ‘आमचं सगळं सात मजली’, ‘साधू’ यासारखी अनेक नाटके, ‘वहिनीसाहेब’, ‘जयमल्हार’, ‘विठू माऊली’, ‘गणपती बाप्पा मोरया’ यासारख्या अनेक मालिकांत त्यांनी छोट्यामोठ्या भूमिका केल्या आहेत.


Web Title: Rickshaw driver turn actor getting famous by his kachra boy character from Majhya Mitrachi Girlfriend Marathi webseries
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.