भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा नवा दबदबा निर्माण केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात स्मृतीने एक असा टप्पा गाठला, जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूला शक्य झाला नव्हता. या सामन्यात अवघ्या १३ धावा करूनही स्मृतीने रोहित शर्माचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारतीय पुरुष संघाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत १५९ सामन्यांत ४ हजार २३१ धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने आता १६१ सामन्यांमध्ये ४ हजार २४४ धावा पूर्ण करून रोहितचा विक्रम मोडला हे. यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला दोन्ही गटात) भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून आता स्मृतीचे नाव अव्वल स्थानी कोरले गेले आहे.
महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
महिला टी-२० क्रिकेटचा विचार करता, स्मृती मानधना आता जगातील दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. या यादीत न्यूझीलंडची सुझी बेट्स (४,७१७ धावा) पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ३,८६९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
द. आफ्रिकेची १-० अशी विजयी आघाडी
विक्रमी खेळीनंतरही भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक नाबाद ४७ धावांची खेळी केली, तर जेमिमा रॉड्रिग्ज (३६ धावा) आणि शफाली वर्मा (३४ धावा) यांनी मोलाची साथ दिली. दरम्यान, १५८ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. यजमान संघाच्या विजयात कर्णधार लॉरा वोल्वार्ड (५१ धावा) आणि ॲनेरी डर्कसेन (४४ धावा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना उद्या, १९ एप्रिल रोजी डर्बन येथेच खेळवला जाणार आहे.