Jemimah Rodrigues Emotional Video: भारतीय महिला क्रिकेटमध्ये गुरूवारी रात्रीच्या खेळीनंतर जेमिमा रॉड्रिग्जचे नाव प्रत्येक भारतीय कधीच विसरणार नाही. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवून दिल्यानंतर, जेमिमाने क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात आणि मनात आपले नाव कायमचे कोरले. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये जेमिमाने अभूतपूर्व खेळी केली. नाबाद शतक ठोकत तिने सात वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. हा क्षण केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही अभिमानाचा क्षण होता. म्हणूनच, ऑस्ट्रेलियाला नमवून भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर, जेमिमा आणि तिचे वडील अतिशय भावूक झाल्याचे दिसून आले.
जेमिमा तिच्या वडिलांना मिठी मारत रडू लागली...
भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांना मिठी मारताना रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे अश्रू हे एका वडिलांच्या आणि त्यांच्या मुलीच्या आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आहेत. ते अभिमानाचे अश्रू आहेत. याच खास दिवसासाठी जेमिमाच्या वडिलांनी आपल्या मुलीला क्रिकेटपटू बनवले होते. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर तिची सर्व स्वप्ने या अप्रतिम खेळीमुळे साकार होण्याकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळेच वडील आणि मुलगी दोघेही भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा
जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या वडिलांना मिठी मारली. त्या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. तो बाप-लेकीच्या मिठीचा अनुभव खूप काही सांगून जातो. जेमिमाचा भावनिक होती. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिला मिठी मारत तिचे अभिनंदन केले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तिच्या भावनांमध्ये तिला साथ दिली. जेमिमाने नंतर भावनिक होत आईला आणि भावालाही मिठी मारली. हे सारेच खूप भावनिक क्षण होते.
जेमिमाची ऐतिहासिक खेळी केली
२०२५च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विजय मिळवणे हे सोपे काम नव्हते. भारतीय संघ एका विश्वविक्रमी लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्यातही भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा धावांवर आणि स्मृती मंधना स्वस्तात बाद झाल्या होत्या. संघाच्या संकटाच्या काळात, जेमिमा आणि हरमनप्रीत या दोघींनी अप्रतिम भागीदारी केली. जेमिमा रॉड्रिग्ज शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिने भारताला ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ अशी ऐतिहासिक मजल मारून दिली. जेमिमाने १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसाठी जेमिमाला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.