Rajeev Shukla Pakistan Boycotting T20 World Cup Match Against India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानने टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध न खेळण्याच्या मुद्यावर भाष्य केले आहे. आयसीसीच्या भूमिकेशी बीसीसीआय सहमत आहे. या प्रकरणी आयसीसीशी चर्चा केल्यानंतरच बीसीसीआय अधिकृत भूमिका मांडेल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला 'वेट अँण्ड वॉच' भूमिकेत असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानला इशाराच दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना पाकिस्तानचा आडमुठेपणा
पाकिस्तानने रविवारी रात्री मोठा निर्णय जाहीर केला. टी २० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सहभागी होणार, पण १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध सामना खेळणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यावर आयसीसीने निवेदनाच्या माध्यमातून पाकिस्तानला ताकीद दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
राजीव शुक्ला नेमकं काय म्हणाले?
राजीव शुक्ला म्हणाले की, आयसीसीने आपल्या निवेदनात खेळभावनेचा उल्लेख केला आहे. बीसीसीआय त्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. आयसीसीशी चर्चा केल्याशिवाय बीसीसीआय कोणतंही अधिकृत वक्तव्य करणार नाही." या प्रकरणात जोपर्यंत ICC अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत बीसीसीआय आपली चाल खेळणार नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.
बांगलादेश प्रकरणाचा उल्लेख
याच पार्श्वभूमीवर आयसीसीने याआधी बांगलादेशला टी २० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर केल्याचंही समोर आलं आहे. भारताविरुद्धचा सामना इतर ठिकाणी खेळवावा, या हट्टावर बांगलादेश ठाम होता, मात्र आयसीसीने ती मागणी फेटाळली होती. पाकिस्तानने बांगलादेशच्या समर्थनार्थ आयसीसीकडे आपला विरोध नोंदवला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा बहिष्काराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
आयसीसीनं आपल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय?
पाकिस्तान सरकारने रविवारी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर भारताविरुद्ध सामना न खेळण्याची घोषणा केल्यानंतर आयसीसीने उशिरा रात्री निवेदन जारी केलं. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "पाकिस्तान सरकारने टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धचा सामन्यावर बहिष्कार टाकण्यासंदर्भातील निवेदानाटी आम्ही दखल घेतली आहे. मात्र, अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अधिकृत पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही. निवडक सामन्यांपासून दूर राहण्याची भूमिका ही जागतिक स्पर्धांच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे. सर्व संघांना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सामने खेळावे लागतात." आयसीसीने पुढे स्पष्ट केलं की, एखाद्या विशिष्ट संघाविरुद्ध किंवा सामन्यापासून दूर राहणं खेळभावनेला धक्का देणारं आहे. हे कोणत्याही परिस्थितीत सहन करण्याजोगे नाही.