नवी दिल्ली - टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल यांचा राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थाच्या (नाडा) २०२६ सालच्या दुसऱ्या तिमाहीसाठीच्या ‘रजिस्टर्ड टेस्टिंग पूल’ (आरटीपी) यादीत समावेश करण्यात आला आहे. ३४८ खेळाडूंच्या या नव्या यादीत अभिषेक आणि अक्षर यांनी स्मृती मानधना आणि श्रेयस अय्यर यांची जागा घेतली आहे.
‘आरटीपी’मधील खेळाडूंना त्यांच्या ठिकाणाची माहिती नियमितपणे ‘नाडा’ला द्यावी लागते आणि दररोज ठरावीक वेळेत डोपिंग चाचणीसाठी उपलब्ध राहणे बंधनकारक असते. ‘नाडा’च्या या यादीत सर्वाधिक खेळाडू ॲथलेटिक्समधील आहेत. त्यांची संख्या ११८ वरून वाढून १३४ झाली आहे. यामध्ये अविनाश साबळे, ज्योती याराजी, तेजस्विन शंकर आणि अनिमेश कुजुर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच, शैली सिंग, मुरली श्रीशंकर आणि तजिंदरपाल सिंग तूर यांनाही स्थान देण्यात आले आहे.
इतर प्रमुख खेळाडू
हॉकी : हरमनप्रीत सिंग, सलिमा टेटे, सविता पुनिया, मनप्रीत सिंग
तिरंदाजी : दीपिका कुमारी, शीतल देवी
बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन.
बाॅक्सिंग : निकहत झरीन, लोवलिना बोरगोहेन.
महत्त्वाचे...
‘आरटीपी’ यादीतील खेळाडू त्यांच्या ठिकाणाची माहिती देण्यात तीन वेळा अपयशी ठरल्यास ते डोपिंग नियमांचे उल्लंघन मानले जाते.
या क्रिकेटपटूंचा समावेश
या यादीत अनेक भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. यामध्ये शुभमन गिल, यशस्वी
जैस्वाल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, अर्शदीप सिंग. तिलक वर्मा, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग ठाकूर यांचा समावेश आहे.
‘नाडा’च्या या यादीत समावेश होणे म्हणजे खेळाडूंवर अधिक जबाबदारी येते आणि स्वच्छ क्रीडा टिकवण्यासाठी कठोर नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरते.