आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
By बापू सोळुंके | Updated: May 18, 2024 16:48 IST2024-05-18T16:47:36+5:302024-05-18T16:48:34+5:30
मराठा समाजाने कधीपर्यंत सहन करायचं? मनोज जरांगे यांचा सवाल

आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीदरम्यान पाया पडते, पदर पसरते, असे गोड बोलता, नंतर मात्र माझ्या समाजावर गुरगुर करता, माझ्या समाजाने हे का सहन करायचे? असा सवाल करीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना नाव न घेता लक्ष्य केले. प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शुक्रवारी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी पत्रकारांनी त्यांच्याशी रुग्णालयात जाऊन संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले की, सततच्या दौऱ्यामुळे तब्येत खालावली होती. आज बरं वाटतय म्हणून तुमच्यासोबत बोलत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही. आता पाचव्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. नाशिक मतदारसंघामध्ये मी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट फिरल्याचे कळाले आहे. मात्र, मी कोणाला पाठिंबा दिला नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत लोक तुमच्या पाया पडतील, मात्र तुम्ही आपल्या मुलांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा, भावनिक होऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाने किती सहन करायचे
बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटत असल्याकडे जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मराठा समाजाने कधीही जातीवाद केला नाही. आज मी दोन्ही समाजाला आवाहन करतो की, दोन जातीत शांतता राहिली पाहिजे. ते लोक निवडणुकीपुरंत गोड बोलतात, नंतर मात्र समाजावर गुरगुर करतात, माझ्या समाजाने हे कधीपर्यंत सहन करायचं असा सवाल त्यांनी केला. या प्रकारामुळे आमच्या पोरांमध्ये प्रचंड रोष असल्याचे जरांगे म्हणाले.
...त्यांना प्रामाणिक समजत होतो
धनंजय मुंडे यांना मी प्रमाणिक समजत होतो. मात्र आता काही दिवसात ते पण कसे आहे हे, समोर आले आहे. माझ्या पाच पिढ्यांनी त्यांना विरोधक मानलं नाही. असे असताना , आता जर त्रास देत असतील, तर काही दिवस लक्ष ठेवा असा सल्लाही जरांगे यांनी समाज बांधवांना दिला.
मोदींना सत्तामिळेपर्यंत गरीबांची गरज
मराठा समाजाचा डर निर्माण झाल्याने एका मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन तीन सभा घ्याव्या लागते असे जरांगे म्हणाले. त्यांना सत्ता मिळेपर्यंत गरिबांची गरज असते. मराठा समाज विरोधात गेल्याने आता मोदी इथेच महाराष्ट्रातच आहेत. दलीत, मुस्लिम समाजाला सत्तेत बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.