... those claims seem exaggerated: R.Balki | चित्रपटाची संहिता जोपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही तोवर ते दावे अतिशयोक्तीचे : आर.बाल्की

चित्रपटाची संहिता जोपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही तोवर ते दावे अतिशयोक्तीचे : आर.बाल्की

ठळक मुद्दे 'पिफ'मधील विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

पुणे : अमुक एका प्रकारच्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवत आहे, असे म्हणणे चुकीचे वाटते. कारण जेव्हा असे कोणी म्हणते त्यांना त्या गटातील प्रेक्षकांना काय हवे आहे किंवा काय आवडू शकेल हे कितपत समजलेले असते या विषयीच शंका वाटते. चित्रपटाची संहिता लिहिल्यानंतर जोपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही तोवर हे दावे मला अतिशयोक्तीचे वाटतात, असे स्पष्ट मत प्रसिद्ध दिग्दर्शक आर.बाल्की यांनी व्यक्त केले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातअर्थात ‘पिफ’मधील विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
तेंडुलकर हे खूप धाडसी लेखक होते. त्यांचे धाडस म्हणजे ते त्यांचे विचार मांडायला कधी घाबरले नाहीत एवढेच नाही तर, बाहेरच्या जगात अशांतता, गोंधळ असतानाही तो गोंधळ त्यांना कधीच अशांत करू शकला नाही. उलट त्याचा वापर त्यांनी आणखी कलात्मक निर्मितीसाठी केला, अशा शब्दात बाल्की यांनी तेंडुलकरांविषयी गौरवोद्गार काढले.
चित्रपट हे फार शक्तिशाली माध्यम आहे. कारण खऱ्या आयुष्यापेक्षा अधिक चित्तवेधक गोष्टी त्यात मांडता येतात. मात्र, हल्ली जगात, लोकांच्या आयुष्यातच एवढ्या लक्षवेधी आणि विचित्र गोष्टी घडत असतात. अशा परिस्थितीत वेगळेपण जपत नवनिर्मिती करणे हे लेखक, दिग्दर्शकांपुढील आव्हान असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मला चित्रपटाच्या कोणत्याही आकृतिबंधाला चिकटून राहायला आवडत नाही; पण चित्रपटासाठी कथाच मला अधिक महत्वाची वाटते. जर तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नसेल तर चित्रपट बनवण्यात अर्थ नाही.
ज्येष्ठ संगीतकार इलियाराजा व चलचित्रकार पी. सी. श्रीराम यांच्याविषयी ते म्हणाले,  हल्ली ‘ओरीजनॅलीटी’ असलेले कलाकार सापडणे फार कठीण आहे. हे दोन कलाकार त्यातील आहेत. इलियाराजा यांचे संगीत मला फार भावते. त्यांचे संगीत मला प्रेरणा देते. ते ऐकत असताना एखादी कथा किंवा कथेतील घटना सुचते. त्यांच्या संगीतात पूर्ण सिनेमा आहे असे मला वाटते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... those claims seem exaggerated: R.Balki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.