Karan Johar furiously reacts to 'drug party' accusation | पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

पार्टीत ड्रग्ज? करण जोहरने पहिल्यांदा सांगितले ‘त्या’ रात्रीचे सत्य

ठळक मुद्देया आरोपांवर तू शांत का बसलात? असे विचारले असता, अशा व्यर्थ गोष्टींवर खुलासे देणे मी सोडले आहे. पण यापुढे असे आरोप झालेच तर मी कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे त्याने सांगित

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती.  या लेट नाईट पार्टीत  दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण हजर  होते. करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  शेअर केला होता. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले होते. व्हिडीओत सर्व स्टार्स ज्या स्थितीत दिसले, त्यावरून ते सगळे नशेत तर्र असल्याचे युजर्सने म्हटले होते. या स्टार्सनी पार्टीत ड्रग्ज घेतल्याचा दावाही केला जात होता. विशेषत: अनेक युजर्सनी पार्टीत हजर असलेल्या अभिनेता विकी कौशलचा फोटो शेअर करून विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला होता. कॅमेरा समोर येताच विकी आपले नाक स्वच्छ करताना दिसला होता, यावरून अनेकांनी तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा अंदाज बांधला होता. आता करण जोहर या वादावर पहिल्यांदा बोलला आहे.


पत्रकार राजीव मसंद यांच्या शोमध्ये करण ही पार्टी आणि त्याच्या व्हिडीओवर बोलला. ‘त्या दिवशी पार्टीत अनेक स्टार्स हजर होते. या सर्वांनी प्रचंड कष्टाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आठवडाभर काम केल्यानंतर हे सगळेजण एन्जॉय करत होते. पार्टीत ड्रग्ज असती तर मी हा व्हिडीओ शेअर केला असता का? मी इतका मूर्ख नक्कीच नाही,’असे करण म्हणाला. विकी कौशल नाक स्वच्छ करताना दिसला म्हणजे त्याचा अर्थ तो ड्रग्ज घेत होता, असा होतो का? एखादी व्यक्ती आपला फोन खिशात टाकत असेल तर तो ड्रग्ज लपवत असेल असा अर्थ निघतो का? असे सवालही करणने यावेळी केले.

‘लाईटच्या रिफ्लेक्शन पडले आणि लोकांनी त्याला ड्रग्ज ठरवले. विकी कौशल त्यावेळी डेंग्यूच्या आजारातून बरा होत होता. तो गरम पाणी आणि लिंबू घेत होता. व्हिडीओ बनवण्याच्या 5 मिनिटांआधीपर्यंत माझी आई त्यादिवशी तिथे हजर होती. माझ्या कुटुंबात फक्त आणि फक्त आनंद वाटला जातो. मित्रांसोबत बसून गप्पा केल्या जातात, चांगले संगीत ऐकले जाते. आम्ही त्यादिवशी वेगवेगळ्या पक्वानांचा आस्वाद घेतला, मस्ती केली, इतकेच, असेही करण म्हणाला.
या आरोपांवर तू शांत का बसलात? असे विचारले असता, अशा व्यर्थ गोष्टींवर खुलासे देणे मी सोडले आहे. पण यापुढे असे आरोप झालेच तर मी कायदेशीर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकत नाही, असे त्याने सांगितले.

Web Title: Karan Johar furiously reacts to 'drug party' accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.