The Kapil Sharma Show: Shakti Kapoor reveals how an 'accidental' meeting with Feroz Khan landed him his first movie | एका अपघातामुळे मिळाला होता शक्ती कपूर यांना पहिला चित्रपट, वाचा हा रंजक किस्सा
एका अपघातामुळे मिळाला होता शक्ती कपूर यांना पहिला चित्रपट, वाचा हा रंजक किस्सा

ठळक मुद्देफिरोज खान गाडीतून बाहेर येताना बघून शक्ती लगेचच म्हणाले होते, ‘सर, माझे नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेतला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात बॉलिवूडचा लाडका ‘बॅड मॅन’ शक्ती कपूर हजेरी लावणार आहे. त्याच्याबरोबर त्याची मेव्हणी आणि बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हजेरी लावणार आहे. या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसातील धमाल आठवणी या कार्यक्रमात कपिल शर्मासोबत शेअर केल्या. फिरोज खान यांच्या गाडीसोबत अपघात झाल्यामुळेच शक्ती कपूर यांना ‘कुर्बानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली याचा किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला.

या प्रसंगाबद्दल बोलताना शक्ती कपूर यांनी कपिलला सांगितले की, “मला विश्वास आहे की सिनेउद्योगात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभेसोबतच नशीबाची साथ असणे देखील आवश्यक असते. केवळ प्रतिभा असेल आणि नशीबाची साथ नसेल, तर तुम्ही या उद्योगात टिकू शकत नाही. काही वर्षांपूर्वी लिंकिंग रोडहून दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर जात असताना माझ्या गाडीची एका मर्सिडिजशी टक्कर झाली. जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा एक उंच देखणा माणूस मर्सिडिजमधून बाहेर पडताना दिसला ते दुसरे कोणी नव्हे तर फिरोज खान होते. त्यांना गाडीतून बाहेर येताना बघून मी लगेचच म्हणालो, ‘सर, माझे नाव शक्ती कपूर, मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेतला आहे. कृपया मला तुमच्या चित्रपटात भूमिका द्या. फिरोज खान यांनी हे ऐकले आणि ते गाडीत बसत निघून गेले.

शक्ती कपूर पुढे सांगतात, “त्या सायंकाळी, मी के. के. शुक्ल या माझ्या जिवलग मित्राच्या घरी गेलो. तो लेखक होता आणि तो फिरोज खान यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटावर काम करत होता. मी गेलो तेव्हा त्याने मला सांगितले की, ‘फिरोज खान चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहेत, जो त्यांच्या गाडीला आज धडकला होता.’ हे ऐकून मी खूप खूश झालो आणि म्हणालो, ‘मीच तो माणूस.’ शुक्लने लगेचच फिरोज खान यांना फोन केला आणि त्यांना शक्ती कपूरबद्दल सांगितले आणि अशा प्रकारे मला माझ्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटात म्हणेजच ‘कुर्बानी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 


Web Title: The Kapil Sharma Show: Shakti Kapoor reveals how an 'accidental' meeting with Feroz Khan landed him his first movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.