bollywood hansal mehta says i supported anna hazare it was big mistake | "अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती", बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा

"अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती", बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने साधला निशाणा

नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  (Anna Hazare) 30 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धीत उपोषणास बसणार होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिद्धीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. यानंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

"अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती" असं हंसल मेहता यांनी म्हटलं आहे. मेहता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून सध्या त्यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. "मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचं समर्थन केलं होतं. मला याचं दुःख नाही आहे कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा 'सिमरन' सिनेमा केला होता" असं हंसल मेहता यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणंही त्यांची चूक होती हे ट्विटवरून स्पष्ट होत आहे. 

हंसल मेहता यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सोशल मीडियातून आणि काही नेत्यांकडूनही अण्णांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता, अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील. 

'... म्हणून उपोषण मागे घेतलं, मी 100 टक्के लोकांचं समाधान करु शकत नाही'

अण्णा आणि फडणवीस भेटीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, अण्णांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सोशल मीडियातून चर्चिले जात आहे. यासंदर्भात अण्णांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना जसा ज्याचा चष्मा तसं त्याला दिसेल, असे उत्तर अण्णांनी दिलंय. ''मला एक महत्त्वाचं वाटलं, उच्चाधिकार समितीमध्ये सरकारचे आणि आमचे, या दोन्ही बाजुचे तज्ज्ञ घ्यायचं ठरलंय. तसेच, आम्ही जे 15 मुद्दे शेतकऱ्यांच्या हिताचे दिले होते, ते मुद्दे स्विकारत या मुद्द्यांवर उच्चाधिकार समितीमध्ये चर्चा होणार आहे. आता, हे आयोगासमोर जाण्यापूर्वी या उच्चाधिकार समितीमध्ये आमच्याही तज्ज्ञ मंडळींकडून सूचना व पाहणी होईल. त्यानंतर, अंतिम अहवाल आयोगाकडे जाईल. चुकीच्या गोष्टीला आमचे लोकं विरोध करतील,'' असं अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood hansal mehta says i supported anna hazare it was big mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.