मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 01:46 PM2024-04-06T13:46:58+5:302024-04-06T13:49:12+5:30

Beed Lok Sabha: शुक्रवारी ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.

Mva rejects candidature jyoti Mate reaction on beed lok sabha seat | मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

Jyoti Mete ( Marathi News ) :बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवगंत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या मतदारसंघात बजरंग सोनवणे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. ज्योती मेटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही मेटे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्या आता नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच शुक्रवारी ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपण निवडणूक रिंगणात उतरायला हवं, अशी इच्छा मेटे यांच्यासमोर बोलून दाखवली. त्यावर ज्योती मेटे यांनी आपण आणखी काही पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची बीड जिल्ह्यात मोठी धग आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी दीर्घकालीन लढा उभारणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे केली होती. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवलेल्या बजरंग सोनवणे यांचा जिल्ह्यात जास्त संपर्क असल्याचं सांगत त्यांच्या उमेदवारीचीही मागणी झाली आणि अखेर पवार यांनी सोनवणे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडीकडून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मी लोकांचं मत विचारात घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं मेटे यांनी स्पष्ट केलं असल्याने त्या नक्की काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

बजरंग सोनवणे यांनाही पक्षांतर्गत विरोध

बजरंग सोनवणे यांना त्यांच्या केज तालुक्यातूनच विरोध आहे. काही दिवसांपूर्वी केज व अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी, असा ठराव केला होता. सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केल्याने येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना अप्रत्यक्ष विरोध केला होता. आता ठराव घेतलेले पदाधिकारी, कार्यकर्ते सोनवणेंचा प्रचार करणार का, याकडेही लक्ष लागलं आहे.

२०१९ च्या निवडणुकीत काय होती स्थिती?

बजरंग सोनवणे यांना २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा सुमारे १ लाख ६८ हजार मतांनी पराभव केला होता. प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. पराभवानंतर सोनवणे फारसे सक्रिय नव्हते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनवणे अजित पवार गटात गेले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना गुरुवारी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

Web Title: Mva rejects candidature jyoti Mate reaction on beed lok sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.