मुंबईतून अमरावतीत एम.डी. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 00:19 IST2026-03-22T00:18:22+5:302026-03-22T00:19:53+5:30
अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत असताना, अमरावती शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबईतून अमरावतीत एम.डी. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत असताना, अमरावती शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईवरून अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एम.डी.) पावडरचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अमली पदार्थ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला २० मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नागपुरी गेट पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात हवा असलेला मुख्य आरोपी अजिम असद शेख (३६, रा. माहीम, मुंबई) हा एम.डी. पावडरची विक्री करण्यासाठी अमरावतीत येणार आहे. या माहितीच्या आधारे लालखडी ते नवसारी रिंग रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यादरम्यान, अजिम शेख आणि त्याला मदत करणारा स्थानिक आरोपी शेख समीर शेख आमीर (२५, रा. गवळीपुरा, अमरावती) या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून ७८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे ११ लाख ७० हजार रुपये असून, एकूण मुद्देमाल १२ लाख १६ हजार रुपयांचा आहे. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली की, या रॅकेटचे जाळे राजस्थानपर्यंत पसरले असून, आरोपींनी तिथून २ किलो ५०० ग्रॅम एम.डी. खरेदी केले होते. आतापर्यंत या प्रकरणात एकूण २ किलो २२० ग्रॅम मुद्देमाल (किंमत ३ कोटी ३४ लाख रुपये) जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गुन्ह्यात हवा असलेला आणखी एक मुख्य पुरवठादार सत्यम गणेश सोनवणे (रा. कुर्ला, मुंबई) यालाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याला पुढील तपासासाठी बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.