चोरीचं सोनं बाळगणं शेतकऱ्याच्या आलं अंगलट, चार तोळ्यांचे गंठण हस्तगत; घरफोडीचा गुन्हा उघड

By दत्ता यादव | Published: May 5, 2024 12:00 AM2024-05-05T00:00:16+5:302024-05-05T00:00:36+5:30

बोरगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करून शेतकऱ्याला अटक केली.

Possession of stolen gold farmer arrested; Crime of burglary revealed | चोरीचं सोनं बाळगणं शेतकऱ्याच्या आलं अंगलट, चार तोळ्यांचे गंठण हस्तगत; घरफोडीचा गुन्हा उघड

चोरीचं सोनं बाळगणं शेतकऱ्याच्या आलं अंगलट, चार तोळ्यांचे गंठण हस्तगत; घरफोडीचा गुन्हा उघड

सातारा : एका अल्पवयीन मुलाने चोरी करून आणलेले चार तोळ्यांचे गंठण स्वत:जवळ ठेवून घेणं एका शेतकऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं. बोरगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करून शेतकऱ्याला अटक केली.

बाळासाहेब बाबूराव बर्गे (वय ५०, रा. माजगाव, ता. सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माजगाव (ता. सातारा) येथील एका घरातून दि. ३ रोजी चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरीस गेले होते. याबाबत बोरगाव पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला होता. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे हवालदार दादा स्वामी, पोलिस नाईक प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, केतन जाधव, विशाल जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या पथकाने गावात जाऊन आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली असता ही चोरी एका अल्पवयीन मुलाने केली असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने चोरी केल्यानंतर सोन्याचे गंठण बाळासाहेब बर्गे याच्याकडे दिले असल्याचे कबूल केले. पोलिसांच्या पथकाने तातडीने बर्गे याला ताब्यात घेतले. त्याने आडेवेडे न घेता चार तोळ्यांचं गंठण पोलिसांच्या हवाली केलं.

चोरीचा कोणताही ऐवज जवळ बाळगणे, हा गुन्हा आहे. असे असताना बाळासाहेब बर्गे याने चोरीचे तब्बल चार तोळ्यांचे दागिने एका अल्पवयीन मुलाकडून स्वत:जवळ ठेवले. हे त्याच्या चांगलंच अंगलट आलं. मोहापायी त्याला कारागृहाची हवा खावी लागली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Possession of stolen gold farmer arrested; Crime of burglary revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.