मुलांच्या स्क्रीन टाइमला पर्याय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 09:32 AM2024-05-05T09:32:53+5:302024-05-05T09:33:10+5:30

मुलांना ऑफलाइन जग नेहमीच आवडतं. आपण सगळ्यांनी हे विसरता कामा नये की, ऑफलाइन जग हे ऑनलाइन जगापेक्षा नेहमीच अधिक रंजक आहे.

What are the alternatives to children's screen time? | मुलांच्या स्क्रीन टाइमला पर्याय काय?

मुलांच्या स्क्रीन टाइमला पर्याय काय?

- मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक
हामारीत मुलांचा स्क्रीन टाइम अचानक वाढला आणि महामारीतून  बाहेर पडल्यावरही तो आहे तसाच आहे किंवा अजूनही वाढलेला आहे. मुलांच्या हातात त्यांचे स्वतःचे फोन कोरोनाने दिले आणि त्याला काहीअंशी आपण मोठ्यांच्या जगाने मान्यता दिलेली आहे. त्यावेळी गरजेची, अत्यावश्यक वाटलेली बाब आता मात्र काळजीची बनली आहे. कारण मुलं त्यांच्या हातातला फोन सोडायला तयार नाहीत. त्यात सुट्टीत शाळाही नसते, त्यामुळे स्क्रीन टाइम अधिकच वाढणार, हे उघड आहे. अशावेळी स्क्रीन नाही तर काय या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं आवश्यक आहे. 

मुलांना ऑफलाइन जग नेहमीच आवडतं. आपण सगळ्यांनी हे विसरता कामा नये की, ऑफलाइन जग हे ऑनलाइन जगापेक्षा नेहमीच अधिक रंजक आहे. मुलांना ते रंजक वाटण्यासाठी मोठ्यांच्या जगाने पहिल्यांदा मोबाइलमधून डोकं बाजूला काढलं पाहिजे. मुलांनी पुस्तकं वाचावीत आणि आम्ही यू ट्यूब बघू हे जमणार नाही. त्यामुळे मुलांनी मोबाइल सोडून जे जे करावं असं पालकांना, शिक्षकांना वाटत असेल ते त्यांनी स्वतः मुलांबरोबर प्रत्यक्ष करणं आवश्यक आहे. उदा. एकत्र पुस्तकं वाचणं, बागकाम करणं, घरातल्या भांड्यांची ओळख मुलांना करून देणं, स्वयंपाकात मदतीला घेणं, पलंगावरच्या चादरींची सुबक घडी करायला शिकवणं, कपडे नीट वळत कसे घालायचे हे दाखवणं, वाळलेल्या कपड्यांच्या नीट घड्या कशा करायच्या हे शिकवणं, घरातलं फर्निचर स्वतः पुसत मुलांना त्यात सहभागी करून घेणं. मुळात मुलांच्या आजूबाजूचे मोठे प्रत्यक्ष काहीतरी काम करताना मुलांना दिसणं आवश्यक आहे. मुलांना काहीतरी शारीरिक हालचाल असलेलं काम करावं यासाठी त्यांच्या मागे लागताना आपण मात्र एकाच जागी बसून मोबाइल बघत बसणार हे गणित आजच्या पिढीच्या मुलांबरोबर जमणं कठीण आहे. ही मुलं लगेच तू मोबाइल बघणार मग मी का नाही, हे विचारतातच. मुलांना पालकांचा वेळ हवा असतो, त्यांच्याबरोबर त्यांना गमतीजमती करायच्या असतात, त्यांच्या जगात काय सुरू आहे हे सांगायचं असतं आणि या सगळ्याला रुपयाचाही खर्च येत नाही. 

मुलं स्क्रीनपासून अशी जातील दूर 
गोष्टीची पुस्तकं सतत विकत आणण्याची गरज नसते, रात्री झोपताना एखादी गोष्ट आपणच रंगवून त्यांना सांगू शकतो. खेळणी विकत घ्यायची गरज नसते, घरातल्याच 
तुटक्या-फुटक्या गोष्टींमधून त्यांना काय हवं ते बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मॉलला न नेता आपलं गाव दाखवायला नेता येऊ शकतं. 

मुलांना ग्राहक बनवू नका
सतत काहीतरी विकत घेतल्याने आपण आपल्याच मुलांना भविष्याचे ग्राहक म्हणून ‘तयार’ करत असतो. ग्राहक म्हणून ते तयार होणारच आहेत; पण त्याचबरोबर ‘सजग ग्राहक’ आपल्याला त्यांना बनवता येईल का हे बघणं आवश्यक आहे, कारण ऑनलाइन जगही त्यांच्याकडे सतत ग्राहक म्हणूनच बघत असतं.

‘या’ गोष्टी का करायच्या? 
कपडे वाळत घालणं, वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करणं, स्वयंपाकातील मदत, घरातल्या भांड्यांची ओळख या सगळ्या गोष्टी जीवन कौशल्यात मोडतात.
आजच्या काळात पाठ्यपुस्तकी शिक्षणाइतकंच जीवनकौशल्ये मुलांना शिकवणं गरजेचं आहे. ही कौशल्ये शिकवण्यासाठी क्लासला घालण्याची गरज नसते, ती घरातून अतिशय छोट्या छोट्या कृतींमधून शिकवता येतात. 
गोष्टी सांगणं हे सृजनशीलता विकसित करण्याचं सगळ्यात प्रभावी तंत्र आहे. कारण त्यात गोष्ट ऐकत असताना सांगितलेल्या गोष्टींची कल्पना करावी लागते.
प्रत्येक मुलाचा कल्पनाविलास भिन्न असतो. टाकाऊ गोष्टींमधून काहीतरी बनवणं यातून आपण आपोआप मुलांपर्यंत टिकाऊपणा, पुनर्वापर या गोष्टी पोहोचवतो, ज्याची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे. 
 

Web Title: What are the alternatives to children's screen time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.