शहरातील सहकार नगरात धाडसी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

By आशीष गावंडे | Published: May 4, 2024 04:58 PM2024-05-04T16:58:26+5:302024-05-04T16:58:32+5:30

हा प्रकार शनिवारी सकाळी कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना अवगत केले.

A daring burglary in the city's sahakar nagar Lakhs worth of goods lost | शहरातील सहकार नगरात धाडसी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

शहरातील सहकार नगरात धाडसी घरफोडी; लाखोंचा मुद्देमाल लंपास

अकोला: शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उच्चभ्रू परिसरातील सहकार नगरमधील रहिवाशी राणी ब्रिजलाल भरतीया यांच्या बंगल्यातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना ३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार शनिवारी सकाळी कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना अवगत केले.

चोरट्यांनी आवारभिंतीला शिडी लावून बंगल्याच्या मागील बाजूने आतमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले. दरम्यान, या धाडसी घरफोडीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

शहरातील उच्चभ्रू परिसर अशी ओळख असलेल्या गोरक्षण रोड भागातील सहकार नगर मधील रहिवासी राणी ब्रिजलाल भरतीया यांच्या बंगल्यात शिरून चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने खदान पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यासह 'डीबी स्क्वाड' पथक, श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळावर धाव घेतली.

चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूने असलेल्या आवारभिंतीला लोखंडी शिडी लावून बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले. तसेच चोरट्यांनी पळ काढताना सोन्या चांदीचे रिकामे झालेले बॉक्स व काही इतर साहित्य बंगल्याबाहेर फेकून दिल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत खदान पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदविण्यात आली नव्हती. त्यामुळे नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला,  याबद्दल काहीही सांगण्यास पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली. 

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली पाहणी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, शहर पोलिस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी भरतिया यांच्या बंगल्याची बारकाईने पाहणी केली. बंगल्याच्या आवारातील तसेच सहकार नगर मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश खदान पोलिसांना दिले आहेत.

Web Title: A daring burglary in the city's sahakar nagar Lakhs worth of goods lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.