- मनीषा सबनीस

लग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. 
तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा,
स्वत्व, स्वाभिमान या साऱ्यासह
एक नातं स्वीकारावं लागतं.
ते स्वीकारताना आपण काय विचार करतो? 

हल्ली लग्न करण्याचं वय वाढलेलं आहे. लग्न न करणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. पण तरी जगात अजूनही लग्नसंस्था टिकून आहे. भले त्याचे निकष बदलले असले तरीही.
मुळात प्रश्न असा आहे की लग्न का करायचं?
आता या प्रश्नाचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. 
कोणी म्हणेल आयुष्यात साथ नको का कोणाची तरी? म्हणून लग्न. कोणी म्हणेल मुलं जन्माला घालून वंश पुढे चालवायला हवा म्हणून लग्न. कोणी म्हणेल लग्न केलं पण विचार नाही केला. घरचे म्हणाले कर,आसपास सगळ्यांचीच लग्न होतात, ते बघितलं म्हणून म्हटलं आपणही करू या लग्न. काही पुरुष म्हणतील, करून खायला घालायला, घर चालवायला, आईनंतर कोणीतरी हवं, म्हणून लग्न. बायका म्हणतील माझं घर, माझा संसार असं भातुकलीसारखं प्रत्यक्षातही हवं म्हणून लग्न. तशी कारणं तर खूप आहेत पण बहुतेक वेळा कारण न कळताच आपल्यापैकी बहुतेक जण लग्न करतात आणि इतरांनाही करायला सांगतात. लग्न ही खरंतर केवढी मोठी गोष्ट. तन, मन, धन, सामाजिक पत, प्रतिष्ठा, स्वत्व, स्वाभिमान, आयुष्यातली महत्त्वाची २५-३० वर्षं ज्यात जातात अशी गोष्ट. पण तितक्या गंभीरपणे लग्नाचा विचार होतो का?
आपण कितीही नाकारलं तरी लग्नाचा म्हणजे लग्नसंस्थेचा उद्देशच मुळी स्त्री-पुरुषांमधील समाजमान्य समागम हा आहे. अर्थात असा समाजमान्य समागम हा अपत्यनिर्मितीसाठीच गृहीत धरलेला असे हा भाग निराळा.
थोडक्यात लग्नसंस्था ही एक सामाजिक संस्था आहे. यात निसर्गाचा काहीही वाटा नाही. निसर्ग फक्त पुनरुत्पादन आणि त्यासाठी नर-मादी समागम मानतो. त्यासाठी निसर्गाला ‘लग्न’ आवश्यक नाही. त्यामुळे या मानवनिर्मित संस्थेचा प्रमुख उद्देश समाजमान्य अपत्यनिर्मिती आणि कुटुंबामध्ये त्यांचं भरण-पोषण हा आहे. लग्न म्हणजे स्वर्गात वगैरे मारलेल्या गाठी नसून पृथ्वीवरच्याच वरवधू संशोधन मंडळांनी, भटजींनी, नातेवाइकांनी आणि विविध आॅनलाइन अ‍ॅप्सनी मारलेल्या गाठी आहेत हे आपल्या आता लक्षात आलं आहेच. मग आता प्रश्न आहे तो लग्न का करायचं याचा आणि ‘लग्नाला काही पर्याय आहे का?’ याचाही.
पहिल्यांदा आपण लग्नाची कारणं आणि त्यानुसार लग्नाचं बदलतं वय बघू. जर मुलं जन्माला घालण्यासाठी लग्न करायचं असेल तर ते २५ ते ३५ पर्यंत केलेलं बरं. तेच जर आयुष्यभराची साथ मिळावी म्हणून करायचं असेल तर ते उशिरा म्हणजे स्वत:ला नक्की काय आवडतं, आयुष्याचे प्राधान्यक्रम काय असणार आहेत, कसा जोडीदार आपल्याला आवडेल याचं नीट भान आणि जाणीव झाल्यावर करावं हे बरं. 
सामाजिक दबाव, घरच्यांचा आग्रह याला बळी पडून लग्न करणार असू तर पुढे जोडीदाराशी पराकोटीच्या तडजोडी कराव्या लागतील आणि कदाचित न पटलेलं नातं मरेपर्यंत निभावत बसावं लागेल याची तयारी असावी. लग्न जर हक्काच्या शरीरसुखासाठी करायचं असेल तर लग्नाच्या वेळी वर-वधूंनी शरीरसौष्ठवाचं महत्त्व एकमेकांना स्पष्ट शब्दांत समजावून द्यायला हवं. नाहीतर सर्वसामान्यपणे भारतात तरी लग्नातली शरीराची मापं वर्षभरात वारेमाप होतात! शरीरसंबंधामध्ये विशेष रुची असलेल्यांनी त्याबद्दलची परस्परपूरकता लग्नाआधी तपासणं इष्ट. प्रेमाबिमाची भानगड असेल तर प्रेमाची व्याख्या एकमेकांशी जरूर जुळवून बघावी. 
जाता जाता लग्नाला असलेल्या पर्यायांचाही आढावा घेऊ. आर्थिक स्वयंपूर्णतेसह अविवाहित राहणं, लिव्ह इन रिलेशनशिपमधे राहणं, ओपन मॅरेज (जिथे विवाहबाह्य संबंधांना उभयताची परवानगी असते). पन्नाशीनंतर शरीरसंबंधाशिवाय एकत्र राहणं, मित्र-मैत्रिणींबरोबर राहणं, एखाद्या कामात/कलेत झोकून देऊन राहणं, कुटुंबातील आणि समाजातील गरजूंना मदत करत जगणं असे अनेक पर्याय हल्ली लोक वापरून पाहत आहेत. अर्थात या साऱ्यापलीकडे लग्न करून संसार करणाऱ्यांची संख्या जगभरात जास्तच आहे. 
मुद्दा काय, आपण लग्न का केलं, का करणार या प्रश्नाचं उत्तर तरी आपलं आपल्याला माहिती हवं.