When Mother Boxer Mary Kom tells her journey in her own words. | मेरी कोम जेव्हा तिचा प्रवास तिच्याच शब्दात सांगते तेव्हा.
मेरी कोम जेव्हा तिचा प्रवास तिच्याच शब्दात सांगते तेव्हा.

- मेरी कोम

ही गोष्ट एका मेरी कोमची नाहीच. माझ्या गोष्टीची सुरुवात मी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्याचा विचार करण्यापूर्वीच झाली होती. ती गोष्ट आहे, माझे गुरु-ट्रेनर-मार्गदर्शक इबोमचा सिंग यांची. 1980च्या दशकातली. आजही भारताच्या नकाशावर मणिपूरची ‘ओळख’ नाही, त्या काळी मणिपूरला ‘मेनलॅण्ड इंडिया’वाल्यांनी ओळखण्याचं काहीच कारण नव्हतं. इबोमचांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग चॅम्पियन होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते सैन्यात होते; पण त्यांना ना पाठिंबा मिळाला, ना सरकारी मदत. 1986 साली जकार्तामध्ये होणा-या प्रेसिडेण्ड कपसाठी त्यांची निवड झाली होती; पण ते जकार्ताला जाऊही शकले नाहीत.

त्यादिवशी इबोमचांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं आणि ठरवलं ज्या राज्यातल्या बॉक्सरच्या वाट्याला अशी अवहेलना येते, त्याच राज्याची ओळख एक दिवस बॉक्सिंग ठरेल. ते त्यांनी खरं करून दाखवलं. आजवर त्यांनी ट्रेन केलेल्या 50 बॉक्सर्सनी आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवली आहेत. इबोमचांना भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. आणि त्यांच्या त्याच तपश्चर्येचं एक ढळढळीत उदाहरण म्हणजे मी, मेरी कोम.

 

त्यांनी माझ्यात भिनवलं नसतं बॉक्सर होण्याचं स्वप्न. आमच्या मणिपुरात अंधार आणि दहशतीशिवाय फार काही नाही. तुम्ही माझ्या गावात येऊन पहा, भीतीनं पोटात गोळा येईल. मिट्ट अंधार आणि सैन्याचा खडा पहारा. थंडीत होणारी उपासमार. मणिपुरातल्या चुराचंदपूर जिल्ह्यातल्या कांगथेई गावातला माझा जन्म. म्हणजे मोईरांगपासून अगदी जवळ. मोईरांग हे भारत-म्यानमार हद्दीवरचं शेवटचं गाव. आमचा सगळा जिल्हाच नशेच्या वाळवीनं पोखरलेला. आजही हे चित्र बदललेलं नाही. जगणं अत्यंत अवघड. त्यात माझ्या आईवडिलांची स्वत:ची जमीन नाही. ते कुणा-कुणाच्या शेतीवर मजुरी करायला जायचे. मी घरात सगळ्यात मोठी. आईवडील कामावर गेले की धाकटी बहीण आणि भावाला सांभाळायची जबाबदारी माझीच. मी मात्र भयंकर चिडकी, अजूनही तशीच आहे. खूप तापट. संताप इतका होतो की वाटतं, तोडून-फोडून टाकावं सारं. माझ्यातल्या भडक माथ्याच्या मेरीला एरव्हीही सारे वचकून असतात.

आपली मुलं अडाणी राहू नयेत म्हणून आईवडिलांनी आम्हा मुलांना मोईरांगच्या ‘लोकताक ख्रिश्चन मिशन स्कूल’मध्ये शिकायला ठेवलं. पण तिथं आठवीपर्यंतच शाळा होती, पुढच्या शिक्षणासाठी मी इम्फाळला आले. इम्फाळमध्ये खेळाचं वातावरण तसं बरं होतं. मलाही पुस्तकात काही फार रस नव्हताच. मला खेळायची आवड होतीच, वाटलं आपणही असंच काहीतरी करावं. पुस्तकं गुंडाळून ठेवून दिली आणि मी सरळ स्थानिक क्लबला जाऊन भेटले. त्यांना सांगितलं मला बॉक्सिंग खेळायचंय. तिथं खुमान लम्पक भेटले. त्यांनी काही दिवस मला प्रशिक्षण दिलं आणि मग माझी आणि इबोमचा सिंगांची भेट झाली. त्यांच्याकडे माझं प्रशिक्षण सुरू झालं. मला कुठून एवढा राग यायचा देव जाणे, तो सगळा राग-संताप बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवायला त्यांनी मला शिकवलं. त्याचदरम्यान मी प्रेमात पडले. दिल्लीत मला ओनलर भेटला. आम्ही लग्न करायचं ठरवलं; पण त्या लग्नाला माझ्या आईवडिलांचा प्रखर विरोध होता. ओनलर माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होता, मी फक्त 23 वर्षांची होते.  पण त्या सगळ्यांच्या विरोधात जात मी ओनलरशी लग्न केलं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइण्ट.
ओनलर भेटला नसता तर एक विशिष्ट टप्प्यानंतर मी बॉक्सिंग सोडून दिलं असतं. मूल झाल्यावर पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये पाय ठेवणं सोपं नसतं. आमच्या खेळात नुस्त्या तोंडानं बाता मारण्यात अर्थ नसतो, शारीरिक क्षमता फार महत्त्वाची असते. ती असेल तर तुम्ही मेण्टली टफ राहता. तुमच्या पंचमध्ये दम नसेल तर तुम्ही रिंगमध्ये काय परफॉर्म करणार.?

 

त्यात दोन मुलांची आई झाल्यावर तर शरीर झिजतंच. आपण कधी बॉक्सिंग रिंगमध्ये उतरू शकू हा विचारच मी सोडून दिला होता. त्यावेळी ओनलर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. घर आणि मुलं मी सांभाळतो असं त्यानं मला वचन दिलं आणि आग्रहानं पुन्हा माझं ट्रेनिंग सुरू केलं. ते सोपं नव्हतं.

आपण दोन मुलांची आई आहोत, हे आपसूक डोक्यात जिरलं-मुरलं होतं. जे बॉक्सिंग मी सहज करत होते, खूप दिवसानंतर ते पुन्हा सुरू केल्यावर मला वाटतच नव्हतं की हे आपल्याला जमेल. आपण पुन्हा एखाद्या स्पर्धेत उतरू, असा काही आत्मविश्वासच नव्हता. आपल्याला जे येतं, तेच येत नाही ही भावना काय असते ही गोष्ट फारतर एखाद्या कलाकाराला किंवा एखाद्या खेळाडूलाच समजू शकते.

तेव्हाही आर्थिक चणचण होतीच. माझ्या उत्पन्नाचे तीन हिस्से मला करावे लागत होते. पहिला हिस्सा माझे आईवडील-भावाबहिणीचा, दुसरा माझ्या घरचा आणि ट्रेनिंगचा आणि तिसरा ओनलरच्या कुटुंबाचा. मुलांचं आजारपण, पैसा, ट्रेनिंग या सा-यात जिवाचा चोळामोळा व्हायचा. आज माझ्याकडे बरेच पैसे आहेत. मात्र मला अजूनही तो दिवस आठवतो 2001 मध्ये पहिल्यांदा मला बक्षीस म्हणून नऊ लाख रुपये मिळाले होते. मी स्वत:साठी एक टू व्हीलर घेतली आणि आईवडिलांसाठी जमिनीचा एक तुकडा. तो दिवस आमच्या घरासाठी किती मोठा होता याची कल्पना कुणीच नाही करू शकणार. पिढय़ान्पिढय़ा दुस-याच्या जमिनीवर राबणा-या आमच्या घरात पहिल्यांदा कुणाला तरी आपली हक्काची जमीन मिळाली होती. माझी आई तो जमिनीचा कागद छातीशी कवटाळून ढसढसा रडली होती. हळूहळू जग कळायला लागलं. या स्पर्धेतल्या यशाला किती अर्थ असू शकतात हे मला बर्‍याच उशिरा कळलं. हेही लक्षात आलं की, बाई म्हणून खेळात करिअर करणं आजही या देशात तितकी सोपी आणि सहज गोष्ट नाही. तुम्ही दुय्यमच ठरवले जाता इथं. त्याचाच मला आताशा राग येतो. कायम लोकांनी आपल्याला कमी लेखायचं आणि आपण जे पदरात पडतंय तेच बरं असं म्हणत सुख मानत रहायचं, या वृत्तीचा मला उबग आलाय !

मणिपुरात आम्ही जन्माला आल्यापासून हेच शिकतो. ‘मॅनेज कर लेना.’ जे आहे ते तसंच ‘चलता है.’ म्हणत स्वीकारायचं आणि जगायचं मन मारून ! बॉक्सिंगने माझ्यातली ही ‘चलता है’ वृत्ती मार खाऊन खाऊन बाहेर काढली. आता कुणी ‘चलता है’ असं म्हटलं की मला वाटतं याच्या नाकावर एक सॉलिड पंच मारावा ! मात्र कुणाकुणाला मारणार.?

गरिबीतून बाहेर पडण्याचा, खेळून नाव कमावण्याचा, जिंकण्याचा जो संघर्ष केला तो या देशात अनेकजण करतात. मात्र नुस्त्या संघर्षाची काही किंमत नसते. लोक सलाम ठोकतात ते तुमच्या यशाला!

म्हणून मला वाटतं, स्वप्नांच्या गोष्टी संपत नाहीत, आम्ही मणिपुरी माणसं तर एरव्हीही फक्त दिवस बदलतील या आशेवरच जगतो. माझ्यावरचा बायोपिक आला त्यानं माझी गोष्ट देशाला समजली. दरम्यान  माझी दोन मुलं होती आता तिसरा लेकही आला.
.आणि आता हा सहावा वर्ल्ड चॅम्पिअन किताबही! 

मेरीची, ओनलरची, बॉक्सिंग आणि मणिूपरची ही गोष्ट अजून बरीच मोठी आहे.

मुलांच्या जन्मानंतर..

मुलांच्या जन्मानंतर स्त्रीचं शरीर बदलतं. त्यात मी तर शारीरिक क्षमता पणाला लावणारं बॉक्सिंग खेळत होते. मुलांच्या जन्मानंतर पुन्हा रिंगमध्ये उतरले तेव्हा काही म्हणता काही जमेना. शरीर साथ देईना. तेव्हा माझा नवरा ओनलर माझ्या पाठीशी उभा रहिला, म्हणाला, मी मुलांना सांभाळतो. तू तुझ्या सरावाकडे लक्ष दे ! माझ्यातली बॉक्सर किती का रागीट असेना, आई तर हळवीच होती. मी इमोशनल व्हायची. कस लागत होता माझ्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा. पण त्याकाळी मीच स्वत:ला पुन्हा पुन्हा सांगत होते, ‘डोण्ट पॅनिक, डू नॉट गिव्ह अप. यू आर नॉट ओन्ली मदर, नॉट अ बॉक्सर. यू आर अ मदर बॉक्सर.!’

शब्दांकन - मेघना ढोके

meghana.dhoke@lokmat.com


Web Title: When Mother Boxer Mary Kom tells her journey in her own words.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.