When Father accepts guardianship alone.. | बाबा जेव्हा एकट्यानं पालकत्त्व स्वीकारतो..
बाबा जेव्हा एकट्यानं पालकत्त्व स्वीकारतो..

पालकत्वाची किंबहुना सुजाण पालकत्वाची जाणीव होते न होते तेवढय़ात एका अनपेक्षित क्षणी एकल पालकत्वाची जबाबदारी घेण्याची वेळ आली. माझ्या पत्नीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आमची मुलगी फक्त दीड वर्षांची होती. नाइलाजाने घटस्फोटाचा निर्णय स्वीकारला आणि मुलीचं शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली.

जबाबदारी तर घेतली; पण हे एकल पालकत्व कसं निभवायचं हा मोठा प्रश्न समोर होताच. पहिले काही महिने मला स्वत:ला सावरण्यातच गेले. सुदैवाने माझं समुपदेशन सुरू झालं होतं. माझ्या समुपदेशिकांनी मला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन केलं. माझे आई, बाबा, माझी सख्खी बहीण यांनी मला खूप धीर दिला.  परिस्थिती सांभाळून घ्यायला मदत केली.  त्याचवेळी मुलीचं संगोपन करण्यास मी सर्मथ आहे हा आत्मविश्वासही मी मिळवला आणि  मग पालकत्वाची ही प्रक्रिया सुलभ होत गेली. आईबाबा विभक्त झाल्याचं दडपण तिच्यापासून जितकं  लांब ठेवता येईल तितकं ठेवण्याचा मी प्रय} करत होतो. मात्र मुलीनेच ही परिस्थिती सहज स्वीकारली आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून तीच माझी गुरु झाली ! ती मला प्रत्येक क्षणी वर्तमानात खेचून आणायची आणि तिच्यासोबत तो क्षण जगायला शिकवायची. ‘आई का नाहीये इथे?’ हा प्रश्न तिनं मला कधी विचारला नाही. बाबाकडे असताना बाबासोबत धमाल करायची आणि आईकडे असताना आईसोबत मजा करायची हे तिला खूप स्पष्ट होतं.
रात्नी माझ्या कुशीत झोपताना ती इतकी निश्चिंत असायची की तिच्या त्या निरागस चेहर्‍याकडे पाहून मी सगळं टेन्शन विसरायचो. तिच्यासोबत रोज बागेत जाणं, पुस्तकं वाचणं, गाणी ऐकणं, चित्नं रंगवणं, वेगवेगळी फुलं वेचणं, तिच्या असंख्य प्रश्नांना संयमानं उत्तरं देणं हे सगळं मी मनापासून जगत होतो, अजूनही जगतोय. भाषेचा शिक्षक या नात्यानं मराठी, हिंदी, इंग्रजी सोबत फ्रेंच भाषेचे संस्कार तिच्यावर करत गेलो. सकाळी एक गोष्ट मराठीत सांगितली की, रात्नी झोपताना तीच गोष्ट मी तिला फ्रेंचमध्ये सांगायचो. रोज सकाळी शास्रीय संगीत ऐकल्यामुळे तिला गाणं आणि संगीत यामध्ये रु ची निर्माण झाली. अडीच वर्षांची असल्यापासून गाण्याच्या क्लासला जायला लागली. मातीत खेळणं, स्वयंपाक करणं, पोळ्या लाटणं, मैदानात खेळणं, पाण्यात डुंबत राहणं, निसर्गाशी एकरूप होणं हे तिला खूप मनापासून आवडतं आणि तिच्या या आवडी आम्ही जोपासायला तिला मदत करतो. मी जर टीव्ही बघायला बसलो तर ती मला उठवते आणि म्हणते, ‘बाबा, टीव्ही नको बघूस, त्यापेक्षा आपण आपल्या खोलीत जाऊन चित्र काढूया किंवा पुस्तक वाचूया..’ 

सुरुवातीला माझ्या मनात प्रश्न होता. ‘ती माझ्याशिवाय कशी राहील?’ आता त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे, ‘तिच्याशिवाय मी कसा राहू शकेन?’
या प्रश्नाचं योग्य उत्तर तिनेच मला दिलं होतं. तिचं आणि माझं  अस्तित्व वेगळं आहे आणि एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व आता मला स्वीकारता येत होतं. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना बगल देऊन केवळ वर्तमानात जगणारी माझी मुलगी प्रत्येक क्षणाचा महोत्सव करत आहे आणि त्यात आम्हा सगळ्यांना सहभागी करून घेत आहे. तिच्यासोबतचे अनेक छोटे-मोठे प्रसंग मी लिहून ठेवले आहेत. त्या प्रसंगांमधून तिचं प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समजूतदारपणा आणि मुख्य म्हणजे निरागसता दिसून येते. पालक म्हणून जेव्हा इतरांकडून ‘छानच सांभाळतो आहेस हो मुलीला.. उत्तम संस्कार देतोयस!’ असं कौतुक होतं तेव्हा मन समाधान पावतं. अर्थात आईची उणीव नक्कीच भासते कारण कितीही प्रयत्न केले तरी काही परिस्थितीत मी आईची जागा घेऊ शकत नाही, ही र्मयादा मी जाणतो. माझी मुलगीदेखील जाणते. दोघांनीही ती मर्यादा आपापल्या पद्धतीने स्वीकारली आहे. पुढे जाऊन तिला अनेक प्रश्न पडतील. ‘इतरांसारखे माझे आई-बाबा एकत्न का नाही राहात?’ हा प्रश्न अगदीच स्वाभाविक आहे. पण ‘यशला न्यायला त्याची आई येते आणि मला न्यायला माझा बाबा येतो.’ हे ती अगदी सहज बोलून गेली, कुठलीही तक्रार न करता!

विभक्त कुटुंब हा मुलांसाठी नक्कीच सकारात्मक अनुभव नसतो. तरीही आपण त्यांना ज्या प्रकारे सांभाळतो, त्यांना जे संस्कार देतो त्यावर त्यांची या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि त्यातही जगण्याचा आनंद शोधण्याची क्षमता अवलंबून असते. त्यांची ही लवचिक मानसिकता जपणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. माझ्या या एकल पालकत्वाच्या प्रवासात माझ्या मावस बहिणी, मावशी आणि काका यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच पत्नीचा आत्ये भाऊ, त्याची बायको आणि अनेक मित्रमैत्रिणींनी मला सावरायला खूप मदत केली. आज कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत, सुखी, समाधानी आहोत  आणि सर्वार्थाने परिपूर्ण आहोत. 

 - एक एकल बाबा


Web Title: When Father accepts guardianship alone..
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.