- माधवी वागेश्वरी

मला जर जगायचं असेल तर ते कसं आणि कुठं जगायचं याचा संपूर्ण अधिकार माझ्याकडे पाहिजे’ असं म्हणते व्हर्जिनिया वूल्फ. आपल्या मानसिक दुखण्यानं त्रस्त राहणारी आणि प्रतिभेचं देणं लाभलेली प्रसिद्ध लेखिका. तिच्या लेखनामुळे कित्येक पिढ्या प्रभावित झाल्या आणि होत आहेत. तिच्या गाजलेल्या ‘मिसेस डॉलवे’ या कादंबरीचा प्रभाव आजही टिकून आहे. त्या प्रभावाला चित्रित करणारा सिनेमा म्हणजे ‘द अवर्स’. 
‘द अवर्स’ हा २००२ चा ११४ मिनिटांचा ब्रिटिश अमेरिकन सिनेमा आहे. दिग्दर्शक आहेत स्टीफन डालड्रे. निकोल किडमन, ज्युलीयाना मुरे आणि मेरील स्ट्रीप या उत्तम अभिनेत्रींनी यात काम केलं आहे. मायकेल कनिंगहॅम यांच्या १९९९ सालच्या पुलित्झर विजेत्या ‘द अवर्स’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून, याचं पटकथा लेखन डेव्हिड हर यांनी केलेलं आहे. जगदविख्यात लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांच्या गाजलेल्या ‘मिसेस डॉलवे’ या कादंबरीनं प्रभावित झालेल्या तीन पिढ्यांतील तीन बायकांचं चित्रण यात करण्यात आलेलं आहे. या तिघींमध्ये खुद्द व्हर्जिनिया वूल्फदेखील आहे. तिचं काम निकोल किडमननं केलं असून, त्यासाठी तिला त्या वर्षीच्या सर्वोत्तम अभिनेत्रीचं आॅस्कर मिळालं होतं यातच सारं काही आलं. 
१९२० सालातली व्हर्जिनया (निकोल किडमन) इंग्लंडमध्ये राहते आहे. तिच्या ‘मिसेस डॉलवे’ या कादंबरीचं लेखन ती करते आहे. तिचा मानसिक आजार बळावत चालला आहे. तिला विचित्र आवाज ऐकू येत आहेत. तिला नैराश्य तीव्रपणे स्वत:कडं खेचतं आहे. १९५० सालातली लॉरा ब्राऊन (ज्युलीयाना मुरे) कॅलिफोर्नियामध्ये राहते आहे. ती गृहिणी आहे. दुसऱ्यांदा गर्भार राहिली आहे आणि आपल्या लग्नात अजिबात सुखी नाही. आपल्या लहानग्या मुलासोबत ती नवऱ्याच्या वाढदिवसाची तयारी करते आहे, तर २००१ सालातली क्लॅरीसा वॅगन (मेरील स्ट्रीप) न्यू यॉर्कमध्ये राहते आहे. प्रतिभावान असणाऱ्या आपल्या कवी मित्राच्या, जो आधी तिचा नवरादेखील होता, त्याला जाहीर झालेल्या पारितोषिकामुळे पार्टीसाठी तयारी करते आहे. तो एड्समुळे मरणपंथाला लागला आहे. तिघींच्या आयुष्यातील गुंतावळ एका समान धाग्यात या सिनेमानं विणली आहे. 
वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या एकाच दिवसातल्या काही तासांची ही कथा नॉन लिनियर पद्धतीनं सांगितलेली आहे. कथेत कधी समोर लॉरा येते, कधी व्हर्जिनिया, तर कधी क्लॅरीसा. तिघींचे काळ वेगवेगळे असले, त्या तीन व्यक्ती म्हणून सुरुवातीला समोर येत असल्या, तरी नंतर लक्षात येतं की या एकच आहेत. काळाला भेदून त्या एकजीव झाल्या आहेत. बाईच्या मनाची घालमेल यात तपशिलात मांडली आहे. १९२३ सालात व्हर्जिनिया वूल्फ ‘मिसेस डॉलवे’ ही कादंबरी लिहिते आहे. १९५१ मध्ये लॉरा व्हर्जिनिया वूल्फची ‘मिसेस डॉलवे’ ही कादंबरी वाचते आहे आणि २००१ मधली बायोसेक्शुअल असणारी क्लॅरीसा वॅगन, तिचा कवी मित्र तिला ‘मिसेस डॉलवे’ असे संबोधतो आहे कारण ती त्याची आधीची बायको आहे. ‘मिसेस डॉलवे’ या कादंबरीतील डॉलवेप्रमाणेच ती स्वतंत्र आणि निराळं आयुष्य जगणारी स्त्री आहे.
व्हर्जिनियाला धास्ती वाटत राहते, आपण स्वत:चा जीव घेऊ याची. व्हर्जिनिया आज नाहीतर उद्या किंवा कदाचित आता आत्महत्या करेल म्हणून तिचा नवरा ताणाखाली वावरत राहतो. तिच्यावर नजर ठेवायला त्यानं स्वत:ची प्रकाशन संस्था घरातच सुरू केली आहे. व्हर्जिनियाला घरात कोंडल्यासारखं झालं आहे. तिला सतत नैराश्याचे झटके येत राहतात. ती नवऱ्याला म्हणते, ‘कोणाला तरी जगणंच संपवावं लागेल म्हणजे इतरांना जगण्याची किंमत कळेल’. संसारात पिचलेली, नको असलेलं गर्भारपण पेलणारी लॉरा, तिचं एक मूल आणि नवरा या सगळ्यांचं काय करावं हे तिला कळत नाहीये. ‘आई झाल्याशिवाय बाईला पूर्णत्व नाही’ असं म्हणणाऱ्या तिच्या शेजारणीकडे, किटीकडे पाहून तिला पोटात डचमळतं आणि ती ‘मिसेस डॉलवे’ ही कादंबरी वाचत राहते. आणि क्लॅरीसा वॅगन ही तिच्या कवी मित्रासाठी आयुष्यात घडलेली इतकी सुंदर गोष्ट आहे की त्याला त्याच्या आजाराचा झालेला त्रास नकोसा झाला आहे आणि त्याची क्लॅरीसासमोर मरण्याची, आत्महत्या करण्याची इच्छा आहे. 
मुळात हा सिनेमा हा अशा तीन बायकांचा आहे, ज्यांनी बाई म्हणून नाही तर ‘माणूस’ म्हणून आयुष्यात निर्णय घेतले. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचे अपराधगंड मनात न ठेवता ज्यांनी थेट जगण्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आहे. त्यांना मरणाच्या बाहुपाशात जाणं सहजशक्य होतं पण त्यांनी ‘जगण्याची’ बाजू घेतली आणि जरी मरणाचा विचार केला तरी त्याला स्वत:हून भिडल्या; जशी व्हर्जिनिया. ती जीवनाची इतिकर्तव्यता संपवून तळ्यात शिरली. 
‘परकायाप्रवेश’ कलाकार कसा करतो याचा प्रत्यय जर हवा असेल तर या सिनेमात निकोल किडमननं साकारलेली व्हर्जिनिया वूल्फ पाहावी. असा हा ‘द अवर्स’ हा सिनेमा अजिबात चुकवू नये असा आहे. कारण तो सांगतो की, कितीही किंमत चुकती करावी लागली तरी चालेल; पण बाईनं स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यायचे असतात.