- माधवी वागेश्वरी
पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करून अ‍ॅण्डी बाहेर पडते. एका लोकप्रिय फॅशन मॅगझीनच्या मुख्य संपादकाची
असिस्टंट म्हणून नोकरीही लागते. कडक शिस्तीच्या बॉससोबत काम करता करता अ‍ॅण्डी नखशिखांत बदलते, सुंदर दिसू लागते; पण हे आपलं खरं रुप नाही, याची जाणीव तिला होते तेव्हा...
पमान’. हा असा अनुभव आहे जो प्रत्येकानं वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतलेला असतो. प्रत्येकाच्या अपमानाचा पोत आणि त्याचा परिणाम भिन्न असतो. आजच्या या सतत ‘प्रेझेंटेबल’ राहण्याच्या जमान्यात अपमानाची जी अनेक रूपं आहेत त्यात पोषाखावरून अपमान केला जातो. आजकाल पोशाखावरून आपल्या अस्तित्वाचंच मूल्य ठरवलं जात आहे. केवळ पोषाखामुळे जगण्याची धारणाच बदलून जाऊ शकते याची जाणीव देणारा सिनेमा म्हणजे ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’.
‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’ ही १०९ म्नििटांची २००६ ची अमेरिकन कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. डेव्हिड फ्र्र्रंकेल यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. अमेरिकन कादंबरीकार लॉरेन वेसबर्जर हिच्या ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’ या कादंबरीवर आधारित ही फिल्म आहे. ही कादंबरी २००३ साली आली होती आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स बेस्ट सेलर लिस्ट’मध्ये सलग सहा महिने टिकून होती. लॉरेन वेसबर्जरनं जगप्रसिद्ध फॅशन मॅगझीन ‘व्होग’मध्ये जे काम केलं होतं त्या अनुभवावर आधारित तिनं कादंबरी लिहिली होती.
मेरील स्ट्रीप आणि अ‍ॅन हॅथवे यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. यात मेरील स्ट्रीपनं साकारलेली पॉवरफूल फॅशन मॅगझीन एडिटर ही भूमिका केवळ अप्रतिम आहे. या भूमिकेसाठी तिला आॅस्कर नामांकन मिळालं होतं.
न्यू यॉर्कच्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या अ‍ॅण्डीची (अ‍ॅन हॅथवे) ही गोष्ट आहे. तिच्या स्वप्नांची, स्ट्रगलची, भावनिकदृष्ट्या मोडून पडण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची. फॅशनचा अजिबातच गंध नसलेल्या अ‍ॅण्डीला ‘रनअवे’ या अत्यंत महत्त्वाच्या फॅशन मॅगझीनची मुख्य संपादक असलेल्या मिरिंडा प्रीस्टलेची पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरी मिळते. मिरिंडासोबत काम करणं म्हणजे ‘कठीण’ शब्दसुद्धा मऊ आहे वाटावा, इतकं भयानक. साधरणपणे २ मिनिटांमध्ये समोरच्या माणसाचा २० वेळा अपमान करण्याची मिरिंडाची ताकद असते. फॅशनच्या जगातल्या अवघड संकल्पना, तिथली ती अगम्य भाषा, विचित्र लोक या सगळ्यात अ‍ॅण्डी भांबावून जाते. २४ तास चालणाºया तिच्या जॉबमुळं तिचं फ्रेण्ड सर्कल आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा तिचा बॉयफ्रेण्डसुद्धा दुरावतो. मुळात अ‍ॅण्डी बुद्धिमान असल्यामुळे ती गोष्टी पटापट शिकते, आधी गबाळी राहणारी अ‍ॅण्डी सुंदर दिसू लागते; पण आपलं हे रूप ‘खरं’ नाही याची चुटपुट तिला लागून राहाते. प्रत्येकाचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक मेकअप वेगळा असतो याची जाणीव होऊन अ‍ॅण्डी मनाचंच ऐकायचं ठरवते.
मिरिंडा ही एक हॉरिबल बॉस असते. ढोबळमानानं अ‍ॅण्डी चांगली आणि मिरिंडा वाईट असा फरक दिसत असला तरी, मिरिंडाचा एक गुण असा आहे की तिला जे हवं आहे ते ती थेट सरळ सांगते. कुठलीच भीडभाड बाळगत नाही. इतकं थेट बोलण्याची ताकद तिनं मेहनत घेऊन मिळवलेली आहे. बाई म्हणून समाजात राहात असताना हे साध्य करणं किती कष्टप्रद असतं हे वेगळं सांगायला नको. बाईनं रागीट असणं, तोडून बोलणं, ऊठसूठ समोरच्या माणसाचा अपमान करणं या गोष्टींकडे समाज कसा पाहतो आणि हे पाहत असताना तो पुरुष आणि स्त्री हा भेद कसा करतो हे पाहणं निश्चितच विचार करायला लावणारं आहे.
मिरिंडाबद्दल बोलताना मेरील स्ट्रीप म्हणाली होती की, ‘मिरिंडा ही आतून ‘शांत’ बाई आहे. वादळ पचवण्याची ताकद असलेली अशी बाईच अख्ख्या स्टाफला ‘पळता भुई थोडी’ करू शकते.’ इतकं असलं तरी ती एक माणूस आहे. तिला संसार आहे. तिच्या खासगी आयुष्यात उलथापालथ सुरू आहे; पण त्याचा मागमूसदेखील ती चेहºयावर दिसू देत नाही. या गोष्टीसाठी प्रचंड ताकद लागते. मिरिंडाच्या व्यक्तिरेखेतील बारकावे मेरील स्ट्रीपनं इतके कमाल दाखवले आहेत की त्याला तोड नाही.
‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’ हा सिनेमा मुख्यत्वे अ‍ॅण्डीच्या दृष्टिकोनातून उलगडत जातो. हा दृष्टिकोन तटस्थपणे पाहत असताना लक्षात येतो की, जगाकडे पाहण्याची आपली किती भाबडी नजर असते. आपण किती स्वप्नाळू वृत्तीनं जगत असतो. कधी कधी तर वाटतं की आपण अक्षरश: बावळट असतो. किती तरी लोकांना आपण विनाकारण देव्हाºयात बसवत असतो. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेणं हा वेगळा मुद्दा असतो; परंतु त्यांची कॉपी करणं म्हणजे स्वत:चा अपमान स्वत:च करण्यासारखं ते असतं. आपल्याला नेमकं काय हवं आहे, काय काम करण्याची आपली इच्छा आणि क्षमता आहे हे प्रामाणिकपणे तपासलंच पाहिजे.
आपण असेच कपडे का घालतो? फॅशनेबल का राहायचं असतं? फॅशनेबल राहणं म्हणजे शिष्ट किंवा वाईट असं काहीही नसतं. ‘फॅशन’ हा एक असा शब्द आहे ज्याचं सुप्त आकर्षण प्रत्येकालाच असतं. आणि त्याचं नेमकं काय करायचं हे अनेकजणांना कळत नाही. त्यामुळे ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ या न्यायानं ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ म्हणलं की मग सगळं सोपं करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो. ना धड ‘साधेपणा’ कळतो ना ‘फॅशन’, सगळाच ‘येड्याचा बाजार’ होऊन जातो.
आपल्या मनाचं मनापासून ऐकणं हा सगळ्यांवरचा उपाय आहे. स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणं यातलं सुखच समजून घायला हवं. ‘आपलं शीर आपल्याच धडावर आहे’ याची लख्ख जाणीव आरशात पाहून होणं फारच गरजेचं आहे..स्वत:साठी!


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.