The happy experience of single guardianship | एकल पालकत्त्वाची आनंदी गोष्ट
एकल पालकत्त्वाची आनंदी गोष्ट

-संगीता बनगीनवार

कुटुंब म्हटलं की प्रत्येकाच्या मनात आई-बाबा आणि मुलं असं चित्र तयार होतं. कधीकधी एकेकटी आई किंवा एकेकाटा बाबा आणि त्यांचं मूल असंही कुटुंब दिसतं.

-तशीच मीही एक एकल पालक आहे. मला स्वत:ला पालक आणि पालकत्वाचा सगळा प्रवास एवढा सुखावह वाटतो की लग्न न करता दत्तक विधानातून मी पालक होण्याचा निर्णय खूप आधी घेतला होता.  

अर्थात काही जणांसाठी ही गोष्ट भन्नाट आहे तर काही जणांना वाटतं, हा शुद्ध वेडेपणा आहे. माझ्या लेखी माझं आई होणं आणि माझ्या लेकीला माझ्यासोबत पूर्ण वाटणं याखेरीज खरंच बाकी सगळं गौण आहे. 
कालचीच गोष्ट आहे, निमिषा, माझी 8 वर्षांची लेक आणि तिची मैत्नीण गप्पा मारत होत्या. ती म्हणाली ‘‘माझ्या  फॅमिलीतील आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत.’
 

निमिषा म्हणाली,  ‘ आम्ही पण!’

 तर ती म्हणाली ‘पण तुला फॅमिली कुठे आहे, तुला तर बाबाच नाही?’ 
निमिषा म्हणाली, ‘माझी फॅमिली म्हणजे माझी आई आणि मी! ’
घरी आल्यावर माझ्याशी बोलताना मी तिला विचारलं ‘तुला कसं वाटलं गं?’ 
तर ती म्हणाली ‘त्यात काय? बर्‍याच जणांना नाही कळत, मी सोडून देते..’ 
आणि  हे सांगताना तिच्या बोलण्यात कुठंही दु:ख किंवा राग जाणवला नाही ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नंतर मला ती म्हणते ‘आई, या मुलांना कळत नाही, बाबा नसणं, मी दत्तक प्रक्रि येतून येणं याही पलीकडे तुझं-माझं नातं आहे.’
 

मी हे ऐकलं आणि माझ्या पिल्लाकडे बघत राहिले. खरंच मुलं आपल्याला खूप काही शिकवत असतात आणि त्यांच्यासोबत आपणही पालक म्हणून रोज मोठं होत असतो.

एकल पालकत्व हे म्हटलं तर सहज आहे आणि म्हटलं तर तारेवरची कसरत असं बर्‍याच पालकांना वाटतं. मला वाटतं हे कुठल्याही पालकांना लागू आहे; ते एकल असू दे नाहीतर दोन्ही असू दे. त्यामुळं आपण पालकत्वाकडे कसं बघतो ते खूप महत्वाचं आहे. मला माझा पालकत्वाचा प्रवास हा तसा सहज वाटतो. एकल पालक म्हणून मी काही निर्णय थोडे विचार करून घेतले. मी आधी आयटी कंपनीमधे नोकरी करायचे, तेव्हा घर, कार आणि काही बचत असं करून 2008 मधे नोकरी सोडली आणि 2 वर्षं कमी कमाई करत वेगवेगळी कामं करत होते जेणेकरून पालक झाल्यावर काय आणि कुठली कामं सहजी करता येईल याचा अंदाज घेत होते. 2011 मधे निमिषा घरी आली. पहिले 3 वर्षं तर मी फक्त मनाच्या समाधानासाठी काम करत होते. 
परंतु या दरम्यान निमिषाच्या मनात घर आणि मला सोडून शाळेत जाताना किंवा कुठेही जाताना असलेली असुरक्षिततेची भावना याची जाणीव सारखी व्हायची. तिला 2 वर्षं या सगळ्यातून जाताना बघून जीव कासावीस व्हायचा परंतु कदाचित ती यातून बाहेर येईल असंही वाटायचं. 

शेवटी ती साडेतीन वर्षांची असताना मी तिला घरीच शिकवायचा निर्णय घेतला. सध्या निमिषासोबत तिचा स्वशिक्षणाचा प्रवास, सोबत दत्तक प्रक्रि येतील पालक आणि मुलं यांना समुपदेशन करणं व वेगवेगळ्या विषयावरील कार्यशाळा घेणं असं बरंच काही चालू असतं.

 पूर्णांक दत्तक प्रक्रियेतील पालक आणि मुलं यांच्यासाठी बनलेला मदत गट हाही या कार्याचा एक भाग आहे. या प्रक्रियेतील पालकांसाठी व मुलांसाठी गेल्या दोन वर्षांपासून मी हिलिंग सुद्धा करते. अर्थात अन्य लोकांनाही याचा नक्कीच उपयोग होतो आणि त्यांच्यापर्यंत मी हिलिंगच्या माध्यमातून मी पोचते. दत्तक पालकात्वामुळे माझ्यातील सुप्त गुणांना भरपूर वाव मिळाला असून मला माझीच जाणीव नव्यानं होतेय.

आता दत्तक विधानातून पालकत्व स्वीकारणा-या सगळ्या एकल पालकांना मी एक सल्ला नक्की देत असते की पालक होण्याआधी थोडी आर्थिक जबाबदारी कमी करून मग पालकत्व स्वीकारलं तर पुढील प्रवास सहज वाटतो. मग आपण पालक म्हणून समाधानी असतो.

एकल पालकत्व हे तारेवरची कसरत किंवा काटेरी प्रवास असं अजिबात नसून एक आनंदी अनुभव आहे. समाजातील सगळ्या घटकांनी म्हणजे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच आजूबाजूला राहणारे सुज्ञ नागरिक आणि मित्र परिवार यांनी एकल पालक, दत्तक मुलं यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने नाही बघितलं तर आम्हा पालकांना ही मोलाची मदत ठरू शकेल. 

विद्यार्थी किंवा आजूबाजूचे मुलं जे बोलतात ते नक्कीच कुठेतरी शिक्षकांकडून व मोठय़ांकडून आलेल्या विचारांचा परिणाम असतो. माझ्या कार्यशाळेतून तसेच वेगवेगळ्या माध्यमातून मी नेहमीच पालकांना सांगते की, दत्तक याविषयी मुलांशी जरूर बोला आणि प्रगल्भपणे बोललात तर समाजातील मानिसकतेमध्ये नक्कीच बदल होताना दिसेल.

खरंतर पालकत्व हे एकल असू दे किंवा दोन्ही पालक असू देत, त्या प्रवासात रोज मुलांसोबत संवाद, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांचं मोठं होणं आणि सोबत आपण पालक म्हणून मोठं होणं यासारखं दुसरं सुख नाही. मुलं आपल्या आयुष्यात त्याचं असं अस्तित्व घेऊन आलेले असतात, मग त्यांना आपण आपल्या साच्यात बसवणं म्हणजे शुद्ध वेडेपणा नाही का? त्यांच्या अस्तित्वाचं भान ठेवून पालक म्हणून आपण फक्त सोबत केली तर मुलांसोबत आपल्यालाही पूर्ण होण्याचा आनंद अनुभवता येईल. 

जागतिक कुटुंब दिनानिमित्त तुम्ही-आम्ही सगळेच पालकत्वाच्या वेगळ्या वाटेवर वेगळे अनुभव जगू. पालकत्व जगू!


( लेखिका एकल पालक असून दत्तक पालकांसाठी ‘पुर्णांक’ हा विशेष उपक्रम चालवतात.)

sangeeta@sroat.org


Web Title: The happy experience of single guardianship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.