शुभा प्रभू-साटम

अगदी अलीकडे एक खूप छान लेख वाचनात आला. लेखाचा विषय होता, ‘सणाचा खरा आनंद कसा मिळवावा?’ किंबहुना हल्ली जो आपण उपभोगतो आहोत तो खरा आनंद आहे का? विचार जरा वेगळा वाटला.
कदाचित अनेकांना पटणारासुद्धा नाही.
पण त्या विचाराकडे थेट त्रयस्थ नजरेनं पाहिलं तर हळूहळू तो विचार पटू शकतो.
माध्यमामधून जे आपल्यावर बिंबवलं जातं ते नेहमी खरं असेलच असं नाही. सण खरे असतात पण ते साजरे कसे करावेत हे आपल्यापेक्षा हल्ली जाहिराती ठरवतात. आणि नकळत आपण अलगद त्यास फशीही पडतो. मग सुरू होतात खरेदीची आर्वतनं. सेल्फीचे धडाके, फेसबुकवरच्या पोस्टी. माझी दिवाळी/ वाढदिवस/ सुट्टी मी कशी मस्त एन्जॉय केली हे अहमिकेनं सांगण्याचा सपाटा इतका की त्याचा शीण येतो. खोटं वाटत असेल तर फेसबुकवर जाऊन पाहा. आपल्याला इतरांकडून एक मान्यता किंवा स्वीकार हवा असतो. आपलं कौतुक व्हावं असं वाटणं चूक नव्हे; पण आपला आनंद फक्त त्यावरच ठरवणं हे निश्चितच योग्य नाहीये. ते मृगजळ आहे.
सणाचा खरा आनंद कशात असतो? खरं तर खरा आनंद शोधून, धुंडाळून मिळत नाही. तो आपल्याच मनात असतो. दिवाळी आत्ताच आटोपलीय. अनेकांनी अनेक भेटवस्तू दिल्या -घेतल्या असतील. आणि नंतर त्यावर चर्चा, शेरेसुद्धा झडले असतील, विशेषत: पाडवा/ भाऊबिजेला. मान्य करा अनेकींना/ अनेकांना आपल्याला मिळालेली ओवाळणी आवडली नसेल. म्हणजे आपल्याला जे दिलं गेलंय ते मुद्दामहून न आवडणारं दिलंय ही रूखरूख जाणवत असेल.
माझी एक मैत्रीण आहे. ती भेटी देताना आपल्याला त्या माणसानं काय आणि किती किमतीचं दिलं होतं याचा विचार करून ती भेटवस्तू देते. तिच्या मते आपण कोणाचे उपकार उगाच का घ्यावे? पण तिच्या बाबतीत असाच विचार करून आलेल्या भेटी मात्र तिला आवडत नाहीत. मग लगेचच तिचा पापड मोडतो. थोडक्यात, मानवी मन विचित्र असतं. अमुक एका चौकटीत बसणं कठीणच.
मग यावर काय करावं?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परतफेडीची अपेक्षा ठेवू नये. मी इतक्या किमतीचं अमुक दिलं. मला मात्र हे असलं काहीतरी मिळालं हा चरफडाट होऊ नये. त्या माणसाशी आपलं नातं काय आहे? कितपत आपुलकी, प्रेम आहे? नातं किती घनिष्ठ आहे? याचा विचार प्रथम करावा. खूप खूप जवळचा माणूस असेल तर ते नातं महत्त्वाचं असतं भेट नाही. पाडव्याला नवºयानं मनाजोगती भेट दिली नाही म्हणून खट्टू झालेल्या अनेकजणी असतील. होतं असं.
पण एक लक्षात ठेवा, महाग भेट तीपण आपल्याला हवी असणारी तो देणारा नवरा फक्त जाहिरातीतच असतो. किंवा अत्यंत दुर्मीळ तरी. बाकी सर्व आपल्या सारखेच साधे. त्यामुळे जे मिळालंय ते देणारा/ देणारी आपल्या दृष्टीनं कितपत जवळची आहे ते बघायचं. ते प्रेम जपायचं. उगीच पैशात तोलायचं नाही.
असा विचार केला की सगळंच हळूहळू सोपं होत जातं. ही भेट त्या माणसानं प्रेमानं दिलीये हे एकदा जाणवलं की मग वैताग चरफडाट होत नाही. कारण अशा भेटीत जिव्हाळा, प्रेम महत्त्वाचं ठरतं. एक उदाहरण देते. - मुलांनी आपल्या वहीतल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहून दिलेलं भेटकार्ड, आईनं दिलेली तिची जुनी पैठणी, भावानं दिलेला ड्रेस, लेकाच्या लेकीच्या पहिल्या पगाराची साडी अशा खूप खूप गोष्टी आहेत. अशी माणसं आणि त्यांच्या भेटी यात माणसं महत्त्वाची. बाकी सर्व दुय्यम. विचार करून पाहा हवं तर!

(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.