- अजित जोशी
स्वामीजी, हे डेरीवेटीव्ह म्हणजे काय हो?’ अचानक गौतमीनं विचारलं.
‘अर्रेच्चा गौतमीताई, आज हे काय अचानक मनात आलं?’ गौतमी लहान होती. आता कुठे टीवायला गेली होती. पण कॉलेजगर्ल असली तरी स्वामीजींच्या सत्संगांना आवर्जून यायची आणि प्रश्नसुद्धा चौकस विचारायची, त्यामुळे स्वामीजींची ती लाडकी साधिका होती.
‘नाही, मी पर्वा वाचत होते की अमेरिकेतली भयानक महामंदी २००८ साली या डेरीवेटीव्हमुळे आली. मग मी थोडं नेटवर सर्फिंग केलं, तर मला कळलं की हा प्रकार भारतातपण असतो. आणि ते नक्की काय आहे, ते समजून घ्यायला मी वाचलंही. पण नीट नाही समजलं.’
‘हं. ऐकलं का तायांनो, एक तर आपल्याला प्रश्न पडल्यावर ही मुलगी स्वत: त्याची उत्तरं काढायला गेली हे खरंच कौतुकास्पद आहे.’ जमलेल्या सगळ्या साधीकांकडे पाहून स्वामीजी मोठ्यानं म्हणाले. तशी शांतता पसरली.
‘मी नेहमी म्हणतो, की हा धनानंद काही नेहेमी कामी येणार नाही. पैशाचे प्रश्न तुमचे तुम्हाला पडले पाहिजेत आणि स्वत: त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त ही डेरीवेटीव्ह जरा एक गुंतागुंतीची गोष्ट आहे आणि फक्त अमेरिकेत नाही, भारतातही आहे. तेव्हा ते सगळ्यांनीच नीट समजून घ्यायला हवं.’, स्वामीजी असं म्हणाल्याबरोबर सगळ्याच बायका सावरून बसल्या.
‘आज तुम्ही बाजारात जाऊन स्कुटी घ्यायची ठरवली आणि कोणत्याही कंपनीला तिची आॅर्डर दिली तर बरेचदा वेटिंग असतं की नाही?’
‘हो ना, काही वेळेला आॅर्डर इतकी असते की कंपन्यांच्या तेवढ्या बाइक्स पटापट बनवूनही होत नाहीत.’ गौतमीलाही आता हुरूप आलेला होता.
‘समजा तुम्हाला डिलिव्हरी देणार आहेत संक्रांतीला, म्हणजे अजून 3 महिन्यांनी. ती स्कुटी बनेल अजून अडीच महिन्यांनी. तर प्रश्न असा आहे, की ती बनवायला लागणारा कच्चा माल (स्टील धातू वगैर) कंपनी कधी घेईल? आजच घेऊन ठेवेल का?’
‘आजच कशाला घ्यायचा? मग तो दोन, अडीच महिने सांभाळून ठेवायची कटकट नाही का उगीच?’ सविता म्हणाली.
‘बरोबर सविता, पण समजा, आज कच्चा माल आहे चाळीस हजार रु पयाला आणि त्यावरून कंपनीनं किंमत ठरवलीये पंचेचाळीस हजार रु पये. आता अडीच महिन्यांनी स्टीलची किंमत वाढली दोन हजार रु पयांनी, तरी फायदा कमी किती होईल?’’
‘ ४५ हजार रु पयांवर दोनच हजार रूपयांनी होईल ना!’ ‘अगं बरोबर आहे पण कंपनीनं प्रत्येक गाडीमागे आजचा नफा जर पाच हजार रूपये ठरवला होता त्यातला दोन हजार कमी झाला तर फटका किती मोठा होईल?’
‘हो. ४० टक्के झाला.’, रमा म्हणाली.
‘अशा वेळेला कंपनी काय करते ? तर स्टील देणाºया कंपनीशी ती एक करार करते. समजा, १० जानेवारीला ‘क्ष’ टन स्टील आम्ही ‘य’ रूपयाला विकत घेऊ असा.’
‘आणि पैसे किती देते त्याचे?’
‘काहीच नाही. पैसे आणि स्टील, दोन्ही १० जानेवारीला दिलं घेतलं जातं. मग किंमत काही असो पण भाव आधीच पक्का झालेला असतो.’
‘पण भाव कमी झाला असेल तर?’ उमाकाकुंची शंका आलीच.
‘तर कंपनीला थोडं नुकसान होईल हो, पण ते नुकसान नाही, फायद्यातली घट आहे. मूळ नफा पाच हजार रु पये ठरलाय, तो नफा मिळेलच की नाही?’, स्वामीजींनी विचारलं.
‘असं, म्हणजे एका अर्थानं किंमतीच्या कमीजास्त होण्यातल्या धोक्यावरचा तोडगा आहे तर हा?’, हुशार झरीनाच्या लगेच लक्षात आलं ते.
‘हो तर, पण दुसरी एक गंमत सांगतो. आता समजा, मी खूप अभ्यास करून ठरवलं की धनानंद इंडस्ट्रीजचा शेअर पुढच्या एका महिन्यात ५० वरून ८० ला जाणार आहे.’
‘तर मग तुम्ही आजच ते खरेदी करून ठेवाल.’
‘हो, पण माझ्याकडे आहेत फक्त हजार रु पये, म्हणजे २०० शेयर्स मिळतील. उद्या तो ८० झाला की फक्त सहा हजार रूपयांचा नफा?’’
‘पण आता तुमच्याकडे पैसेच तेवढे आहेत, तर तुम्ही काय करणार?’
‘सांगतो ना, मी आपल्या उमाकाकुंशी करार करेन की त्यांनी मला आजपासून एका महिन्यांनी धनानंद इंडस्ट्रीजचे ५००० शेयर्स 55 रु पयानं विकावेत.’
‘ओहोहो, थांबा स्वामीजी,
मी पुढचं सांगते’,
गौतमी उत्साहात आली.
‘आता एका महिन्यांनी तुम्हाला उमाकाकुंना द्यायचे असतील फक्त 2,75,000 आणि तुमच्यापाशी असतील दहा हजार रूपये पण जर भाव ८० झाला, तर त्या शेअर्सची किंमत असेल चार लाख, मग ते विकून तुम्हाला उमाकाकुंचेही पैसे देता येतील आणि घसघशीत नफाही होईल.’
‘भले शाब्बास, आता हा आहे डेरीवेटीव्हजचा दुसरा उपयोग. किंमतीच्या चढउताराचा फायदा करून घ्यायचा.’
‘पण स्वामीजी,
शेअर्सची किंमत ५० ची ४५ झाली म्हणजे?’,
उमाकाकूंनी घाबरत प्रश्न विचारलाच.
‘एकदम बरोबर प्रश्न आहे काकू’,
स्वामिजी हसत म्हणाले.
‘पण याविषयी पुढच्या संत्सगात.


(लेखक चार्टर्ड अकाउण्टण्ट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत. meeajit@gmail.com)