coriander facepack | कोथिंबीरचा लेप
कोथिंबीरचा लेप

भाजी, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ तेव्हाच चविष्ट होतात जेव्हा त्यांच्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरली जाते. कोथिंबिरीमुळे पदार्थाला चव आणि सौंदर्य दोन्ही मिळतं. पण ही कोथिंबीर फक्त यासाठीच भुरभुरली जात नाही. खरं तर अनेक गुणांचा खजिना म्हणजे कोथिंबीर. लोह, क जीवनसत्त्व, शरीरास आवश्यक असे अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स असं सर्व काही कोथिंबिरीमध्ये असतं. कोथिंबीर चावून खाल्ल्यानं त्वचेवरचा ताण हलका होतो. त्वचा लवचिक होते. कोथिंबिरीमुळे शरीराला अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट मिळतात आणि त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. कोथिंबिरीमध्ये असलेल्या लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते. उठल्यानंतर रिकाम्यापोटी कोथिंबिरीची पानं धुवून चावून खाणं हे आरोग्यदायी असतं.
चेहऱ्यावर जर मुरूम, पुटकुळ्या, फोड असतील, ब्लॅकहेड्स असतील तर कोथिंबिरीचा रस काढून तो चेहऱ्यास लावल्यास उत्तम फायदा मिळतो. त्वचेचे अवघड विकारही कोथिंबिरीच्या उपयोगानं आटोक्यात येतात. तसेच ओठ काळे असल्यास कोथिंबीर ओठांना रगडून लावल्यास ओठ मऊ होतात आणि काळसरपणाही जातो.
कोथिंबीर पोटात गेल्यानं अ‍ॅसिडिटी कमी होते. अ‍ॅसिडिटी कमी झाल्यास अ‍ॅसिडिटीनं होणारे त्वचाविकारही आटोक्यात येतात. त्वचेसाठी कोथिंबीर वापरण्याच्या काही पद्धती आहेत. याच पद्धतीनं कोथिंबीर वापरल्यास त्वचेचा पोत सुधारून त्वचा निरोगी होते.

१ कोथिंबीर आणि कोरफड
ताजी कोथिंबीर वाटून घ्यावी. त्यात कोरफडचा गर घालावा. हे मिश्रण चांगलं एकत्र करावं आणि ते चेहऱ्यास लावावं. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात.

२ कोथिंबीर आणि लिंबाचा रस
वाटलेल्या कोथिंबिरीमध्ये थोडा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहऱ्यास लावल्यास मुरुमाचे डाग, फोडांच्या जखमा बऱ्या होतात. ब्लॅकहेड्स जातात. तसेच चेहऱ्यावरच्या मृत पेशी निघून जातात. या मिश्रणाच्या लेपामुळे त्वचेला नवेपणा प्राप्त होतो.

३ कोथिंबिरीचा फेस पॅक
कोथिंबीर रगडून घ्यावी. त्यात थोडं दूध, मध आणि लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण लेपासारखं चेहºयास लावावं. यामुळे त्वचा चमकते, उजळते.

४ कोथिंबीर आणि तांदूळ
त्वचेला नवता प्राप्त करून देण्याचं काम कोथिंबीर आणि तांदूळ हे कॉम्बिनेशन करतं. यासाठी तांदूळ वाटून घ्यावेत. त्यात कोथिंबिरीचा रस घालावा आणि तो लेप लावावा. यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना आणि पेशींना आराम मिळतो. त्वचा फ्रेश होते.
 


Web Title: coriander facepack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.