मजबूत हाडे, लवचीक व सशक्त सांध्यांसाठी अविरत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:18 AM2024-05-01T08:18:05+5:302024-05-01T08:18:20+5:30

'महाराष्ट्र अस्थिरोग संघटना' आपला चाळिसावा स्थापना दिवस आज साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने या संघटनेच्या कार्याचा परिचय !

Continuous work for strong bones flexible and strong joints | मजबूत हाडे, लवचीक व सशक्त सांध्यांसाठी अविरत काम

मजबूत हाडे, लवचीक व सशक्त सांध्यांसाठी अविरत काम

गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्रातील अस्थिरोगतज्ज्ञांच्या सहभागाने 'महाराष्ट्र अस्थिरोग संघटना' कार्यरत आहे. १९८३ साली महाराष्ट्रातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञांनी या संघटनेची स्थापना केली. सर्व अस्थिरोगतज्ज्ञांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये परस्पर सौहार्द निर्माण करणे आणि वैद्यकीय ज्ञानाची देवाणघेवाण करत राहून, शस्त्रक्रियेच्या कौशल्याच्या दृष्टीने बदल घडवून निष्णात शल्य चिकित्सकांचा संघ उभा करणे हे त्यांचे उद्दिष्ट महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेने गेल्या ४० वर्षांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. अस्थिरोगतज्ज्ञांच्या चिकित्सक गुणांमध्ये भर घालण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. अस्थिरोग विषयातल्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती, उपयोगिता फक्त शहरी स्तरावर मर्यादित न राहता तालुका स्तरावर पोहोचली. त्यामुळे या उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग खेडोपाडीच्या रुग्णांनाही मिळू शकला.

ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञांमधील नैपुण्य त्यांच्यापुरतेच मर्यादित राहत होते, ते संघटनेच्या व्यासपीठावर सादर केल्यामुळे व्यापक स्तरापर्यंत पोहोचले. सर्व अस्थिरोगतज्ज्ञांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वाजवी दारात उपलब्ध करून देण्यातही संघटनेने मोलाची भूमिका पार पाडली आहे. तरुण अस्थिरोगतज्ज्ञांना अनुभवी तज्ज्ञांबरोबर कामाची संधी देऊन शल्यचिकित्सेमधील बारकावे अवगत करण्यासाठी संघटनेतर्फे फेलोशिपही दिली जाते. कायदेशीर गुंतागुंतीच्या बाबतीतही संघटना अस्थिरोगतज्ज्ञांना आवश्यक ते साहाय्य करते.

महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचा स्थापना दिवस म्हणजे १ मे. या दिवशी महाराष्ट्रातील अस्थिरोगतज्ज्ञ निःशुल्क आणि निःस्वार्थ सेवा देतात. भारतीय अस्थिरोग संघटनेच्या खांद्याला खांदा लावून देशभर समाजोपयोगी कार्य करण्यात राज्य संघटनाही अग्रणी असते. यामध्ये सामान्यतः रुग्णांची मोफत तपासणी तसेच रक्त, लघवी, आदी तपासण्याही विनामूल्य केल्या जातात. अस्थिरोग तज्ज्ञांकडून मोफत शस्त्रक्रिया शिबिरे घेतली जातात, तर काही ठिकाणी मोफत औषधे, कमरेचे, मानेचे किंवा गुडघ्याचे बेल्ट याचेही वाटप केले जाते.

दरवर्षी १ ते ७ मे दरम्यान प्रत्येक अस्थिरोगतज्ज्ञ आपापल्या सोयीच्या दिवशी सेवा देतात. संधिवाताचे रुग्ण तसेच वयस्कर रुग्णांची तपासणी, खेळाडू तसेच पोलिस, सैन्यभरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांची त्यांच्या अकॅडमीत जाऊन तपासणी व मार्गदर्शन, ज्येष्ठ नागरिक संघांसाठी सांध्याची झीज व हाडांच्या ठिसूळपणावर मार्गदर्शन, कॅल्शियमची तपासणी, अपंग मुलांच्या अस्थिरोग संबंधातील शस्त्रक्रिया, आदी उपक्रम निःशुल्क केले जातात. संघटनेतर्फे अॅम्ब्युलन्सचे ड्रायव्हर्स तसेच वाहतूक शाखेतील पोलिसांना प्रथमोपचारांचे प्रशिक्षण, अपघातानंतर आवश्यक तातडीच्या सेवांबाबत मार्गदर्शन केले जाते.रस्त्यावर अपघात साधारणपणे तरुणांचे होतात, त्यात घरातली कमावती व्यक्ती दगावल्यास अवधे कुटुंब संकटात सापडते,त्यामुळे हे मार्गदर्शन लाखमोलाचे आहे. 

यावर्षी महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कोठाडिया व सचिव डॉ. अभिजित वाहेगावकर यांनी या संघटनेच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने 'सेव्ह युवर जॉइंट्स' म्हणजेच आपल्या सांध्यांची काळजी घ्या, ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. मोफत सांधे तपासणी शिबिरे, वयस्कर नागरिकांना सांध्यांबद्दलच्या आरोग्याची माहिती देणे, कॅल्शियम तपासणी शिबिरे, सांधे सुदृढ राहावे यासाठी योग्य व्यायाम, जीवनसत्त्वाचे महत्त्व तसेच हाडांचा ठिसूळपणा वाढू नये यासाठी घेण्यात येणारी काळजी असे उपक्रम राबविले जातील.
- प्रतिनिधी

Web Title: Continuous work for strong bones flexible and strong joints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.