सातारा जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

By नितीन काळेल | Published: May 10, 2024 06:43 PM2024-05-10T18:43:26+5:302024-05-10T18:45:02+5:30

घर, शाळेचे नुकसान, वीजपुरवठाही खंडित 

unseasonal rain with storm in Satara district; Traffic blocked due to fallen trees | सातारा जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

सातारा जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

सातारा : जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच आज, शुक्रवारी दुपारनंतर सातारा शहरासह पाटण तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसानच अधिक झाले. पाटणला घर आणि शाळेवरील पत्रे उडाले. तसेच रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली. वीजतारा तुटल्यानेही काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली. दरम्यानच आभाळ भरुन आलेले. त्यामुळे अवकाळी पाऊस होणार अशी चिन्हे होती. मात्र, हा पाऊस काही भागातच पडला. सातारा शहरात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला मोठमोठे थेंब पडले. त्यानंतर पावसाने जोर धरला. जवळपास अर्धा तास शहर आणि परिसरात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल उडाली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.

पाटण तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवर झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.

जवळपास एक तासभर वादळी पाऊस सुरू होता. वादळामुळे तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. वीजवाहिन्यावरही झाडे पडली आहेत. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Web Title: unseasonal rain with storm in Satara district; Traffic blocked due to fallen trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.