‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:51 PM2024-05-20T19:51:52+5:302024-05-20T19:52:55+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट विरोधात असला तरी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाची मुख्य लढाई ही भाजपासोबत होती. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याचं चित्र दिसत होतं. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज महाराष्ट्रातील मतदान आटोपल्यानंतर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक भावूक पत्र लिहिलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: 'This battle is not over, but now it has really begun', Jayant Patil's emotional letter to Sharad Pawar group workers | ‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत हे गट आमने-सामने आले होते. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये थेट लढत झाल्या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. या निवडणुकीत अजित पवार गट विरोधात असला तरी शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाची मुख्य लढाई ही भाजपासोबत होती. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याचं चित्र दिसत होतं. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्रातील मतदान आटोपल्यानंतर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक भावूक पत्र लिहिलं आहे. ही लढाई संपलेली नाही. आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे. २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून शरद पवार यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवागी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात जयंत पाटील लिहितात की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेब यांच्या या कुटुंबाचे सदस्यच आहोत. गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत. ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता, विचार आणि मूल्यांची आहे. महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न हा काही आजचा नाही. तो गेली साडेतीनशे वर्ष होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची बाजी लावली पण दिल्लीचे मांडलिकत्व स्वीकारले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी तर मृत्यू पत्करला मात्र ते दिल्लीसमोर झुकले नाहीत. आदरणीय पवारसाहेब हे याच महापुरुषांचे वैचारिक वारसदार आहेत, ते दिल्लीसमोर का झुकतील? काही अदृश्य शक्तींनी आपले पक्ष, चिन्ह काढून घेतले आहे, मात्र जे गेले त्याचा शोक करायचा नाही, मोठ्या ताकदीने समोर येणारी लढाई लढायची हाच आपला विचार आहे.

या पत्रात जयंत पाटील पुढे लिहितात की,  आपण सर्वांनी एकत्र येऊन पाशवी शक्तींच्या विरोधात लढायचे ठरवले आहे. ही लढाई महाराष्ट्रात आणि देशात रोजगाराची निर्मिती व्हावी, शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा, शोषितांचे दुःख दूर व्हावे, यासाठीची ही लढाई आहे. २०२४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्व जण मोठ्या ताकदीने 'टीम शरद पवार' या भावनेने काम केले. राज्यातील जनतेने प्रचंड असा विश्वास आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतांच्या संख्येच्या रूपात ते आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईलच, असी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

मात्र ही लढाई संपलेली नाही. आत्ता खरी लढाई सुरु झालेली आहे. २०२४ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना संपूर्ण राज्य ढवळून काढून आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचे सरकार आणायचे आहे. जे आपल्याला सोडून गेले, ते गेले. आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बाधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानांवर नेऊन बसवायचे आहे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील आपण सर्वांनी केलेल्या अथक परिश्रमाच्या बद्दल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे  आभार मानले. तसेच नव्या लढाईसाठी सज्ज होऊन शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, असे आवाहनही पत्राच्या शेवटी जयंत पाटील यांनी केले. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: 'This battle is not over, but now it has really begun', Jayant Patil's emotional letter to Sharad Pawar group workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.