Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात भक्कम पुरावे, जामीन रद्दच करा

By उद्धव गोडसे | Published: May 9, 2024 05:26 PM2024-05-09T17:26:29+5:302024-05-09T17:26:54+5:30

सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तीवाद

Strong evidence against Virender Singh Tawde, the suspect in the Govind Pansare murder case, Cancel the bail | Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात भक्कम पुरावे, जामीन रद्दच करा

Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात भक्कम पुरावे, जामीन रद्दच करा

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून ते गुन्हेगारांना शस्त्र आणि दुचाकी पुरवण्यापर्यंत संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याचा सहभाग असल्याचे इतर संशयितांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडे डॉ. तावडे याच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. त्याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे त्याचा जामीन रद्दच व्हावा, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी गुरुवारी (दि. ९) जिल्हा व सत्र न्यायालयात केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली.

पानसरे खुनातील प्रमुख संशयित आरोपी डॉ. तावडे याचा मंजूर झालेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी अर्जाद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे. यावर झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर अटकेतील इतर संशयितांचे जबाब वाचून दाखवले. पानसरे यांच्या खुनाचा कट रचणे, त्यासाठी बेळगावातून शस्त्र उपलब्ध करणे, मारेक-यांना प्रशिक्षण देणे, त्यांची कोल्हापूर, बेळगावसह विविध ठिकाणी राहण्याची सोय करणे, गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकीची खरेदी करण्यात तावडे याचा सहभाग होता. 

गुन्ह्यानंतर मारेक-यांना पळून जाण्यात डॉ. तावडे यानेच मदत केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली आहे. तावडे हा गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्यामुळे त्याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे तावडे याचा जामीन रद्दच करावा, अशी मागणी ॲड. निंबाळकर यांनी केली. पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार, त्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वतीने युक्तीवाद होणार आहे.

चोरीतील दुचाकीची १० हजारांत खरेदी

डॉ. तावडे याने बेळगावातून चोरीतील दुचाकी १० हजारांत खरेदी केली. तीच लाल रंगाची दुचाकी मारेक-यांनी पानसरे यांच्या खुनात वापरली. तावडे यानेच बेळगावातून आणलेले शस्त्र मारेक-यांना पुरवले होते. गुन्ह्यानंतर त्यानेच शस्त्राची विल्हेवाट लावली. कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात अटक असलेेले शरद कळसकर आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या जबाबातून तावडेबद्दल सविस्तर माहिती समोर आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

Web Title: Strong evidence against Virender Singh Tawde, the suspect in the Govind Pansare murder case, Cancel the bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.