कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार; रवींद्र चव्हाणांनी मांडली भूमिका, मुंबईबद्दल मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 22:32 IST2026-01-21T22:29:40+5:302026-01-21T22:32:54+5:30
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात शिंदेसेनेने आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असतानाच भाजपाने आपला दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार; रवींद्र चव्हाणांनी मांडली भूमिका, मुंबईबद्दल मौन
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेत कोणाचा महापौर बसणार, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईत महापौर मिळावे अशी शिंदेसेनेची मागणी आहे. त्यासाठी ठाणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीमध्ये रणनीती करून दबाव आणताना शिंदेसेना दिसत आहे. अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार, असे म्हटले आहे. चव्हाण यांनी मात्र मुंबईच्या महापौर पदाबद्दल मौन बाळगले. त्याचबरोबर या तीन महापालिकांच्या महापौरांचा निर्णय कधी होईल, याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
महापौरपदाबद्दलचा निर्णय कधी होणार?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महापालिका महापौर पदाबद्दल बोलताना सांगितले की, "कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर अंतिम निर्णय होईल."
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परतल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्रित मुंबईत बैठक होईल. तीनही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे, त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार", असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकामध्ये महापौर करण्यासंदर्भात यापूर्वीच चर्चा केली आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांची भेट झाली होती, त्यावेळी महापौर पदाबद्दल चर्चा झाली होती.
शिंदेची ठाण्यात खेळी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपावर दबाव टाकण्यासाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला सोबत घेतले आहे. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे भाजपाला बाजूला ठेवून सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात आहेत का? अशी चर्चा सुरु आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपाने शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेत भाजपाला धोबीपछाड दिला आणि सत्तेत बसले. आताही त्याचीच पुनरावृत्ती होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मुंबईच्या महापौराबद्दल भाजपाचे मौन
रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातील तीन महापालिकांच्या महापौर पदाबद्दल भूमिका मांडली. मात्र, त्यांनी मुंबईच्या महापौरपदाबद्दल बोलणं त्यांनी टाळले आहे. मुंबईचेही महापौर मिळावे, असे प्रयत्न शिंदेसेनेचे आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून तडतोडीस नकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाच्या नेत्यांकडूनही मुंबईच्या महापौर पदाबद्दल बोलताना महायुतीचाच महापौर होईल म्हणत कोणत्या पक्षाचा होणार, हे बोलणं टाळले जात आहे. त्यामुळे फडणवीस महाराष्ट्रात परतल्यानंतरच याबद्दलचे चित्र स्पष्ट होणार आहे.