Shark Tank India: लेट्स हॅव डील... 'स्टार्ट अप'च्या महासागरात छोट्या माशांना 'ऑक्सिजन' देणारे 'शार्क'

By मोरेश्वर येरम | Published: January 26, 2022 01:13 PM2022-01-26T13:13:49+5:302022-01-26T13:22:34+5:30

'शार्क टँक इंडिया' हा 'रिआलिटी शो' कार्यक्रम भारतासाठी नवा असला तरी जगभरात याचे अनेक सीझन येऊन गेले आहेत. २००१ साली सुरू झालेला 'शार्क टँक' रिआलिटी शो आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये विस्तारला गेला आहे.

Shark Tank India Lets Have a Deal television reality show on start ups | Shark Tank India: लेट्स हॅव डील... 'स्टार्ट अप'च्या महासागरात छोट्या माशांना 'ऑक्सिजन' देणारे 'शार्क'

Shark Tank India: लेट्स हॅव डील... 'स्टार्ट अप'च्या महासागरात छोट्या माशांना 'ऑक्सिजन' देणारे 'शार्क'

googlenewsNext

- मोरेश्वर येरम

समुद्रातील सर्वात धोकादायक प्राणी किंवा 'टायगर ऑफ दी सी' म्हणून शार्क मासे ओळखले जातात. शार्ककडे आजवर आपण भीती, व्हिलन किंवा घातक अशाच अर्थाने पाहात आले आहोत. पण ताकद, चपळाई, हुशारी, संवेदनशील घ्राणेंद्रिये आणि आक्रमकता या सर्व बाबतीत शार्क इतरांपेक्षा वरचढ असल्याने समुद्रात त्यांचे प्राबल्य आहे हे विसरून कसे चालेल?  शार्कच्या याच गुणांची उपमा देऊन सोनी टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या 'शार्क टँक इंडिया' कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे. खरंतर 'शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) हा 'रिआलिटी शो' भारतासाठी नवा असला तरी जगभरात याचे अनेक सीझन येऊन गेले आहेत. २००१ साली सुरू झालेला 'शार्क टँक' रिआलिटी शो आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये विस्तारला गेला आहे. परदेशात आतापर्यंत १८० हून अधिक सीझन प्रदर्शित झाले आहेत. तर जगभरात ३० हून अधिक पुरस्कार या हटके 'रिआलिटी शो'ला प्राप्त झाले आहेत.

'शार्क टँक' हा एक रिआलिटी शो असला तरी तो इतरांपेक्षा खूप वेगळा ठरतो. इथे स्पर्धकाला फक्त एकदाच संधी मिळते आणि निकालही त्याचवेळी लागतो. इथे ना वोटिंगची अपील, ना एलिमेशन, ना इतर स्पर्धकांशी स्पर्धा. त्यामुळे इतर 'रिआलिटी शो'च्या गोतावळात हा शो 'हटके' ठरतो. 

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देशात अनेक नवउद्योजक आपल्या कल्पक बिझनेस संकल्पना सादर करुन कोट्यवधींची उलाढाल करणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास हातभार लावणारा उद्योग उभा करण्याचे स्वप्नं उराशी घेऊन मेहनत घेत आहेत. भारतात स्टार्टअप नावाची संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तरुण उद्योजकांनी बदलायला घेतलेली गणिते, बाजारपेठेचे बदलते चेहरे आणि भविष्यातील आव्हाने याबाबत नवउद्योजकांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने 'शार्क टँक शो'कडे पाहायला हवे. 

'शार्क टँक'ची नेमकी संकल्पना काय?
देशातील सात बडे तरुण उद्योजक या कार्यक्रमात शार्क म्हणून ओळखले जातात. तर स्टार्टअप सुरू केलेले तरुण उद्योजक आपल्या कल्पक संकल्पना या 'शार्क' समोर तितक्याच कल्पक पद्धतीने सादर करतात. आपल्या स्टार्टअपचा उद्देश, काम आणि कारभार याची संपूर्ण माहिती देऊन झाल्यानंतर स्पर्धक 'शार्क्स'कडे आपल्या कंपनीत ठराविक रक्कम गुंतवणुक करण्यासाठी निमंत्रित करतात. नवउद्योजकाची संकल्पना ज्या 'शार्क'ला भावते ते संबंधित नवउद्योजकाच्या कंपनीत भागीदार होण्यासाठी तयारी दर्शवतात आणि थेट समोरासमोर 'बिझनेस डील' केली जाते. आपल्या कंपनीतील काही टक्के भागीदारीच्या मोबदल्यात नवउद्योजकांना पैसे मिळतात. तसेच 'शार्क'सोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होते. 

'शार्क टँक इंडिया'मध्ये 'शार्क'च्या भूमिकेत देशातील सात बडे उद्योजक सहभागी झाले आहेत. यात 'बोट' या इलेक्ट्रॉनिक कंपनीचा संस्थापक अमन गुप्ता, Shaadi.com चा संस्थापक अनुप मित्तल, Lenskart कंपनीचा संस्थापक आणि सीईओ पियुष बन्सल, 'भारत पे' कंपनीचा संस्थापक अश्नीर ग्रोवर, शुगर कंपनीची संस्थापक आणि सीईओ विनीता सिंग, Emcure Pharmaceuticals कंपनीची संस्थापक नमिता थापर आणि MamaEarth कंपनीची संस्थापक गझल अलग यांचा समावेश आहे. 

'पिचर्स' vs 'शार्क्स'
'शार्क टँक इंडिया' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकूण ५० हजाराहून अधिक अर्ज आले होते. यातील केवळ १९८ जणांना 'शार्क्स'समोर आपली बिझनेस संकल्पना सादर करण्याची संधी पहिल्या सीझनमध्ये मिळाली आहे. येथे स्पर्धकांना 'पिचर्स' संबोधले जाते तर 'पिचर्स'च्या संकल्पनेत पैसा गुंतवणाऱ्यांना 'शार्क' म्हटले जाते. पिचर्स आपल्या स्टार्टअप्सची संपूर्ण माहिती शार्क्सना देतात. त्यानंतर स्टार्टअपमध्ये आर्थिक आणि शार्क्सच्या अनुभवाच्या गुंतवणुकीची इच्छा पिचर्स व्यक्त करतात. अर्थात शार्क्स त्यांची मुलाखत घेऊन आणि प्रश्नांचा भडीमार करुन पिचर्सची पारख करतात त्यानंतरच खेळ सुरू होतो 'बिझनेस डील'चा. यात सर्वोत्तम डील करण्याचा शार्क्सचा प्रयत्न असतो, तर आपली संकल्पना सर्वोत्तमपणे सादर करुन कमीत कमी भागीदारीच्या मोबदल्यात जास्तीत जास्त अर्थसहाय्य मिळवण्याचा पिचर्सचा प्रयत्न असतो. अखेरीस पिचर्स विरुद्ध शार्क्स यांच्यातील वाटाघाटीचा मेळ साधला जातो आणि शार्क्स थेट धनादेश देऊन पिचर्सच्या नवउद्योगात भागीदार होतात. 'शार्क'ने 'स्टार्टअप्स'ना गिळण्याचा हा खेळ असला तरी यात विजय खरंतर 'शार्क' आणि 'पिचर्स' या दोघांचाही होतो. पिचर्सना उत्तम गुंतवणुकीसह आपल्या नवउद्योगासाठी अनुभवी आणि बाजारात आधीच बस्तान बसवलेले आयते स्रोत उपलब्ध होतात. तर 'शार्क्स'ना मिळतो कमाईसाठीचा नवा उद्योग आणि साधन.   

तरुणाईमध्ये जोरदार चर्चा
भारतात २० डिसेंबरपासून सुरू झालेल्या या शोनं काही आठवड्यातच लोकप्रियता प्राप्त केली आहे. आतापर्यंत आलेल्या पिचर्समधून भारतातील नवउद्योजक आणि तरुणाईच्या संकल्पनांनी अनेकाचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच उद्योग जगतात यशोशिखर गाठलेल्या तरुण 'शार्क्स'च्या तोंडून मोलाचे सल्ले आणि अनुभव नवउद्योजकांना ऐकायला मिळतात. यामुळे तरुणाईच्या मनात या 'रिआलिटी शो'ने अल्पावधितच एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  

बांबूपासून टूथब्रश बनवण्याचा स्टार्टअप, इकोफ्रेंडली कॉसमेटिक्स, साबणचा बिझनेस असो किंवा मग इलेक्ट्रिक स्कूटर, डाएट चिप्स, ऑटोमॅटिक पाळणा, व्हेन्टिलेटेड पीपीई किट असो अशा विविध संकल्पनांवर स्टार्टअप सुरू केलेले नवउद्योजक या शोमध्ये सहभागी झाले होते. 

'शार्क्स'ने कार्यक्रमातून दिलेले शिकण्यासारखे सल्ले कोणते?

>> कोणताही स्टार्टअप सुरू करताना बिझनेसचा विचार करता समस्येचा विचार करावा. एखाद्या समस्येचे समाधान आपण ग्राहकाला देणार असू तरच बिझनेस मोठा होतो. त्यामुळे बिझनेसच्या मागे न धावता समस्येचा पाठलाग करा. 

>> स्टार्टअप सुरू करण्याआधी बाजाराचा ट्रेंड ओळखणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात आधी किमान वर्षभर तुम्ही सुरू करणार असलेल्या बिझनेसबाबत आणि प्रोडक्टबाबत ग्राहकांचं मत जाणून घ्या. 

>> बिझनेसच्या मार्केटिंगवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा आधी स्थानिक पातळीवर ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा जास्त विचार करा. तुमचे खरे ग्राहक तुम्ही स्वत:हून जोडू शकलात आणि पाया उभारू शकलात त्यानंतरच मार्केटिंगवर खर्च करावा. 

>> स्टार्टअपमध्ये विविध उत्पादने एकाच वेळी ग्राहकांसमोर उपलब्ध करुन देऊ नयेत. सर्वात आधी तुमची स्पेशालिटी असलेल्या उत्पादनावरच पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे. मार्केटमध्ये एकच दमदार उत्पादन द्यावे आणि त्या उत्पादनातून कंपनीची ओळख निर्माण झाली पाहिजे. एखाद्या उत्पादनामुळे तुमची बाजारात चांगली ओळख निर्माण झाल्यानंतरच इतर उत्पादनांचा विचार करणे जास्त योग्य ठरते. यातून तुम्हाला अधिकाअधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. 

>> आपण तयार केलेले किंवा बाजारात आणलेले उत्पादन सर्वोत्तम आहे हे तुम्ही स्वत: ठरवू नका. ते ग्राहकांना ठरवू द्या. त्यामुळे 'ग्राहक हाच देव' हे नेहमी लक्षात ठेवूनच काम करत राहिले पाहिजे.

Web Title: Shark Tank India Lets Have a Deal television reality show on start ups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.