The role of superguru in 'The Voice' is very different - A. R. Rehman | ‘द व्हॉइस’मधील सुपरगुरूची भूमिका अगदी वेगळी - ए. आर. रेहमान
‘द व्हॉइस’मधील सुपरगुरूची भूमिका अगदी वेगळी - ए. आर. रेहमान

 

ए. आर. रेहमान हे एक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आहेत. आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रेहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ते ‘द व्हॉइस’ या आगामी कार्यक्रमात सुपरगुरु म्हणून लाभले आहेत. एकंदरीत त्यांच्या या भूमिकेबाबत आणि त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...

-रवींद्र मोरे 

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाविषयी काय सांगाल?
- उत्कृष्ट गायकाचा शोध घेणारा जगातील अत्यंत प्रसिध्द आणि चार ‘एमी’ पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील १८० देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केली आहे. आता भारतातही या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. भारतातील उत्कृष्ट गायकांचा शोध घेण्यासाठी ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात केवळ उत्कृष्ट आवाजाच्या दर्जावरच भिस्त ठेवली जाणार असून त्यात जात-पात, लिंग, धर्म, भाषा, प्रादेशिकता वगैरे कोणतेही भेद केले जाणार नाहीत. अप्रशिक्षित, पण निव्वळ उत्कृष्ट आवाज असलेल्या गायकांचा शोध घ्यायचा, नंतर कार्यक्रमातील प्रशिक्षकांकडून (कोच) त्यांच्यातील गायनकलेचं संवर्धन करून त्यांच्या गायकीला सफाईदार करणं आणि नंतर त्यांच्यातील क्षमतेचा विकास करून त्यांना उत्कृष्ट गायक बनविणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यातील स्पर्धकांना त्यांच्या मर्जीच्या प्रशिक्षकाकडे शिक्षण घेण्याची संधी दिली जाते आणि ही एक फार मोठी संधी म्हटली पाहिजे. या कार्यक्रमाच्या इतिहासात प्रथमच त्याचं स्वरूप भारतासाठी काहीसे बदलण्यात आले असून त्यात सुपरगुरूचे पद निर्माण करण्यात आलं आहे. भारतातील या कार्यक्रमात सुपरगुरू म्हणून मी काम बघणार आहे.

 ‘द व्हॉइस’मध्ये सुपरगुरूचे पद स्वीकारण्यामागील तुमचे कारण कोणते?
- या कार्यक्रमात सुपरगुरू म्हणून मला एक विशेष काम करावे लागणार आहे. त्या कामाची माहिती मिळाल्यानंतर मला हे पद नाकारण्याची इच्छा झाली नाही. माझ्या वाढदिवशी मी हे पद स्वीकरण्यास संमती दिली. नव्या, गुणी गायकांचा शोध घेण्यात आणि त्यांना योग्य ती संधी उपलब्ध करून देण्यात माझी मदत होणार असल्याने मी हे पद स्वीकारलं. या कार्यक्रमाच्या काही आंतरराष्ट्रीय आवृत्त्या मी पाहिल्या असून त्या फार उत्तम प्रकारे निर्माण करण्यात आल्या होत्या. त्या पाहताना मला अंगात वीज सळसळल्यासारखं झालं. कोणत्याही उमेदवाराला केवळ त्याच्या आवाजाच्या दर्जावरून परीक्षा घेऊन त्याला भावी गायक बनविण्यासाठी सिद्ध करणं ही संकल्पना मला विशेष आव्हानात्मक वाटली. या कार्यक्रमासाठी उमेदवार निवडण्याची पहिली पायरी ही अंध परीक्षा असते. म्हणजे कार्यक्रमाच्या प्रशिक्षकांना इच्छूक उमेदवाराचा प्रथम फक्त आवाज ऐकविला जातो. त्याचं नाव किंवा त्याची कोणतीही माहिती त्यांना दिली जात नाही. त्यानंतर हे प्रशिक्षक माझ्या मदतीने यातील दर्जेदार आवाजाची निवड करून त्यांना भावी गायक बनविण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात. या इच्छूक उमेदवारांना आपला आवाज जगभरातील श्रोत्यांपर्यंत नेण्याची मोठी संधी या कार्यक्रमाद्वारे मिळते आणि पुढे या उमेदवारांचं रुपांतर व्यावसायिक गायकांमध्ये होताना पाहणं ही मला फार मोठी गोष्ट वाटते. तसंच एखाद्या व्यक्तीची निवड तो कोण आहे, कोणत्या प्रांतातील आहे, त्याची सामाजिक पार्श्वभूमी काय वगैरे इतर कोणत्याही निकषांवर न करता निव्वळ त्याच्या आवाजाच्या दर्जावर करणं ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. म्हणूनच मी या कार्यक्रमात सुपरगुरूचं पद स्वीकारले.

तुमच्या सुपरगुरूच्या भूमिकेविषयी जरा विस्ताराने माहिती द्या. तुम्ही या कार्यक्रमात कशा प्रकारे योगदान करणार आहात?
- ही एक अगदीच वेगळी भूमिका आहे. त्यातील उमेदवारांच्या आवाजाचा कस वाढविताना त्यांना माझ्याकडील संगीतविषयक ज्ञान देणं हा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव असून मीसुध्दा एकीकडे वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाने समृध्द होत असतो. या कार्यक्रमात मी स्पर्धकांना संगीतावरील माझे विचार आणि ज्ञान देणार आहे. उमेदवाराने आपली कामगिरी सादर केली की मी प्रशिक्षकांना त्याच्या गाण्यातील उणीवा आणि त्याची क्षमता याबद्दल माझं मत सांगीन. तसंच एखाद्या गाण्याबद्दल असलेली विशेष माहिती, त्याची पार्श्वभूमी वगैरे काही गोष्टीही मी सांगणार आहे. गीताला संगीत देण्याची प्रक्रिया कशी चालते, त्याची माहितीही मी देईन. याशिवाय मी माझ्या जीवनातील संघर्ष, जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना आणि माझ्या संगीतमय प्रवासातील काही वैयक्तिक आठवणीही प्रशिक्षकांना सांगणार आहे.

तुम्ही आता टीव्हीवरील एखाद्या मालिकेत सहभागी होण्याचा निर्णय का घेतला?
- संगीताच्या क्षेत्रात सध्याचा काळ फारच रंजक असून सुपरगुरूची भूमिका मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. भारतात गुणी लोकांचा तुटवडा नाही. पण अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यातील गायनकलेचा विकास आणि संवर्धन करणं महत्त्वाचं आहे. मग ते कोणत्याही माध्यमातून का होईना. ‘द व्हॉइस’मुळे त्यांच्यातील या कलागुणांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

गाण्याविषयीच्या इतर रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांपेक्षा ‘द व्हॉइस’ कशा प्रकारे वेगळा आहे?
या कार्यक्रमासाठी निव्वळ इच्छुकाला न बघता निव्वळ त्याचा आवाज ऐकून त्याच्यातील गायनगुण ओळखणं हा माझ्या मते या कार्यक्रमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ही संकल्पना मला आवडली, पटली आणि त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय मी घेतला. ही संस्मरणीय घटना असून नव्या स्पर्धकांची निवड करण्यास मी उत्सुक बनलो आहे. 

एखाद्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात परीक्षण करणे हे किती कठीण काम आहे? तुम्ही काहीसे धास्तावलेले आहात काय?
- ‘द व्हॉइस’मध्ये सुपरगुरू बनणं ही फारच उत्सुकतेची गोष्ट आहे. इतर रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांप्रमाणे या कार्यक्रमात परीक्षक नसतात, तर प्रशिक्षक असतात. ते या उमेदवारांना प्रशिक्षित करतात आणि त्यांच्यातील कलेचं संवर्धन करतात. या कार्यक्रमात उमेदवाराला आपली कला सादर करण्याची आणि स्वत:लाच आव्हान देण्याची संधी मिळते आणि त्याद्वारे स्वत:चा विकास करण्याची संधी उमेदवारांना मिळते. सुपरगुरू या नात्याने मी माझ्या अनुभवांवर आधारित ज्ञान आणि मते प्रशिक्षकांना देणार आहे. 

या कार्यक्रमात कशा प्रकारचा आवाज तुम्हाला निवडावासा वाटेल?
त्यासाठी माझ्याकडे विशिष्ट असा कोणताही फॉम्युर्ला नाही. कधी कधी एखादा गायक गाण्यातून ज्या प्रकारे भावना व्यक्त करतो, त्यामुळे माझं लक्ष वेधलं जातं. तसंच गाण्यातील शब्दांचे उच्चार कसे केले जातात, त्याकडेही माझं लक्ष असतं. प्रत्येकाकडे देण्यासारखं काही ना काहीतरी असतंच आणि त्याचा लाखो लोकांनी स्वीकार केला, तर त्यांचं आयुष्य पालटतं. प्रत्येकाला स्वत:चं असं व्यक्तिमत्त्व असतं, ओळख असते आणि तीच त्यांचा ठसा निर्माण करते.

काम करीत राहण्यामागील तुमची प्रेरणा काय?
- संगीत कसं तयार करायचं, इतकंच मला येतं आणि तीच माझी प्रेरणा आहे. माझ्या दृष्टीने संगीत हा केवळ व्यवसाय नाही. लोकांना जेव्हा एखादं गाणं आवडतं, तेव्हा संगीतकाराचं जीवनही बदलतं. या व्यवसायात तुम्हाला जसं मानसिक समाधान मिळतं, तसं समाधान तुम्हाला अन्य कोणत्याही व्यवसायात मिळणार नाही. लोकांना जेव्हा एखादं गाणं आवडतं, तेव्हा ते तुमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव करतात, त्यामुळे तुमचं मन समाधानाने भरून जातं. तेव्हाच मला जाणवतं की मी जे करतो आहे, ते सार्थकी लागत आहे.


 


Web Title: The role of superguru in 'The Voice' is very different - A. R. Rehman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.