ठळक मुद्देमाझा पहिला चित्रपट शम्मी कपूरसोबत होता आणि त्याच्या सोबत काम करणे मला खूप सहज आणि सोपे वाटले होते. आमचे ट्युनिंग इतके छान जुळून आले होते की, कधी कधी आम्ही आमच्या स्टेप्स स्वतःच ठरवायचो. अनेक गाणी अशी होती, ज्यात आम्हाला नृत्यदिग्दर्शकाची गरजच लागली नाही

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींना पाहण्याचा योग येणार आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा निर्माता हा सलमान खान आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात त्याने त्याच्या भावंडांसोबत आणि वडिलांसोबत हजेरी लावली होती. प्रेक्षकांना हा भाग प्रचंड आवडला होता. यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत.

हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. कपिल शर्माने आशा पारेख यांना या कार्यक्रमात विचारले की, त्यांचा आवडता सह-कलाकार कोण आहे? त्यावर आशा पारेख यांनी उत्तर दिले की, “माझा पहिला चित्रपट शम्मी कपूरसोबत होता आणि त्याच्या सोबत काम करणे मला खूप सहज आणि सोपे वाटले होते. आमचे ट्युनिंग इतके छान जुळून आले होते की, कधी कधी आम्ही आमच्या स्टेप्स स्वतःच ठरवायचो. अनेक गाणी अशी होती, ज्यात आम्हाला नृत्यदिग्दर्शकाची गरजच लागली नाही.”

शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्यात कशी थट्टा मस्करी चालायची हेही आशा पारेख यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “एकदा आम्ही काश्मिरमध्ये शूटिंग करत होतो आणि शम्मीजींची मान अवघडली होती. त्यामुळे त्याने तातडीने एका पहलवनाला बोलावले. इतक्याशा गोष्टीसाठी त्याने पहलवानाला बोलवावे या गोष्टीवर मी इतकी हसले होते! पण दुसर्‍या दिवशी मीच पडले आणि माझा पाय मुरगळला. मीही त्या पहलवानाला बोलावून घेतले आणि मालिश करून घेतली. त्यामुळे शम्मी कपूर मला खूप हसला होता.”

द कपिल शर्मा शो या मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनीवर पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Asha Parekh and Shammi Kapoor used tease each other during shoots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.