मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

By संतोष भिसे | Published: May 6, 2024 05:12 PM2024-05-06T17:12:16+5:302024-05-06T17:15:12+5:30

मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येणार

The polling booths in Sangli will be decorated with grapes, sugarcane | मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

सांगली : मतदान केंद्रांवरील रुक्ष आणि तणावपूर्ण वातावरणात दिलाशासाठी प्रशासनाकडून अनेक हटके उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक मतदान केंद्र महिला कर्मचारी हाताळतील. एक केंद्र दिव्यांग कर्मचारी, तर एक कर्मचारी संपुर्णत: युवा अधिकारी सांभाळणार आहेत.

लोकसभेसाठी मंगळवारी (दि. ७) जिल्ह्यात मतदान होत आहे. त्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याअंतर्गतच मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुके द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहेत, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील मणेराजुरी येथील मुलींच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र द्राक्षभूमी या संकल्पनेतून सजविली जाणार आहे. द्राक्षांची छायाचित्रे, भित्तीचित्रे आदींसह द्राक्षघडांची सजावट असेल.

वाळवा तालुका ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे इस्लामपूर शहरातील हजरत मोहम्मद सुलेमान उर्दू हायस्कूल या केंद्राची सजावट करताना ऊस पिकाची संकल्पना राबविण्यात आली आहे. प्रत्यक्ष ऊसासह ऊस शेती, साखर कारखाना, ऊसतोड मजूर आदींची भित्तीचित्रे तेथे असतील.

सांगली शहरातील नवीन अग्नीशमन केंद्राजवळील महापालिका शाळा क्रमांक २४ आणि इंदिरानगरमधील एमएचआय प्रायमरी उर्दू स्कूल ही मतदान केंद्रे चित्रांनी सजविली जाणार आहेत. निवडणूक काळात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील चित्रे या केंद्रांत मांडण्यात येणार आहेत.

फक्त महिला कर्मचाऱ्यांकडून चालवली जाणारी मतदान केंद्रे : आदर्श शिक्षण मंदिर, मिरज, जिल्हा परिषद शाळा वासुंबे (ता. तासगाव), विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा, यशवंत हायस्कूल, इस्लामपूर, तलाठी कार्यालय, विटा, जिल्हा परिषद कन्नड शाळा, जत, श्रीरंग कदम महाविद्यालय, कडेगाव.

दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालविली जाणारी केंद्रे :  अंबाबाई तालीम संस्थेचे फार्मसी महाविद्यालय, मिरज, प्राथमिक शाळा, रेड (ता. शिराळा), श्रीरंग कदम महाविद्यालय, कडेगाव.

आदर्श मतदान केंद्रे : बापुजी साळुंखे महाविद्यालय, मिरज, महांकाली हायस्कूल, कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोकरुड (ता. शिराळा), उर्दू हायस्कूल, इस्लामपूर, बळवंत महाविद्यालय, विटा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जत, उर्दू प्राथमिक शाळा, इंदिरानगर, सांगली, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर, पलूस.

Web Title: The polling booths in Sangli will be decorated with grapes, sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.