Sangli Municipal Election 2026: स्वतंत्र लढतीद्वारे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दबावतंत्राची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 18:15 IST2026-01-03T18:13:43+5:302026-01-03T18:15:25+5:30
उमेदवार नसलेल्या प्रभागांचे काय?

Sangli Municipal Election 2026: स्वतंत्र लढतीद्वारे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दबावतंत्राची खेळी
संतोष भिसे
सांगली : महापालिकेच्या ७८ पैकी फक्त ३३ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे सत्तेच्या निर्णयात किंगमेकर होण्याचे मनसुबे असल्याचे स्पष्ट होत आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांपैकी कोणाच्याही सोबत हातमिळवणी न करता स्वतंत्र लढती द्यायच्या, निकालानंतर सत्तेसाठी निर्णायक प्रसंगी पाठिंबा द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यात मोक्याची पदे मिळवायची, हे राजकीय गणित असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात आहे.
राज्यात महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या अजित पवार गटाने सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीची वाटचाल सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ अशी ठेवली आहे. किंबहुना, राष्ट्रवादीचे नैसर्गिक सहकारी पक्ष असलेला शरद पवार गट किंवा काँग्रेससोबतही पक्षाने हातमिळवणी केली नाही. ‘युती किंवा आघाडीसाठी कोणालाही प्रस्ताव दिला नव्हता,’ असे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासूनच पक्षाने किंगमेकरची व्यूहरचना आखली असावी, असा अंदाज आहे.
वाचा : विरोधकांना ५० उमेदवारही मिळाले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला
वास्तविक या निवडणुकीत पक्षाकडे पुरेसे उमेदवार होते. भाजपपाठोपाठ अजित पवार गटात दुसऱ्या पक्षांतून येणाऱ्यांची संख्या मोठी होती. शिवाय इनकमिंग करणारे अनेक कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या ताकदवानही होते. त्यामुळे पक्षाला सर्व म्हणजे ७८ जागा स्वबळावर लढविणे मुश्किल नव्हते. तरीही ३३ जागांपर्यंत मजल कायम ठेवत पक्षाने ‘ठंडा करके खाओ’ ही भूमिका कायम ठेवली.
युती आणि आघाडीला अप्रत्यक्ष मदत
अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे उर्वरित ठिकाणी भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि शिंदेसेनेला अप्रत्यक्ष मदत झाली आहे. पक्षाच्या सर्वच म्हणजे ३३ जागा निवडून आल्या तरी पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी निकालानंतर कोणाच्या पारड्यात जास्त जागा पडतात, हे पाहून पाठिंब्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पाठबळाच्या जोरावर उपमहापौर, सभापतिपदे आणि प्रसंगी महापौर ही हुकमी पदे मिळवली जाऊ शकतात. स्पष्ट बहुमत नसतानाही अजित पवार गट किंगमेकर बनू शकतो. अशा वेळी भाजपला बहुमत मिळते की काँग्रेस आघाडीला याच्याशी मतलब नसेल हे स्पष्ट आहे.
उमेदवार नसलेल्या प्रभागांचे काय?
अजित पवार गटाने ३३ जागा लढविण्याचे ठरविल्यानंतर उर्वरित ४५ जागा असलेल्या प्रभागांतील कार्यकर्त्यांनी काय करायचे? याचे उत्तर मात्र पक्षाकडे नाही. तब्बल सात वर्षांनी निवडणुका होत असल्याने कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली होती; पण पक्षाने तब्बल ४५ जागा रिकाम्याच सोडून दिल्याने तेथील कार्यकर्त्यांनी काय करायचे? हा प्रश्न आहे. ‘अन्य प्रभागांत जाऊन आपल्या ३३ उमेदवारांच्या प्रचाराचे काम करायचे? की तटस्थ राहून घरातच थांबायचे?’ हा प्रश्न या कार्यकर्त्यांपुढे आहे. या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे प्रा. जगदाळे यांनी सांगितले.