Sangli Municipal Election 2026: सांगलीत महायुतीमध्ये फूट, राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदेसेना पडली बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:22 IST2025-12-29T14:21:01+5:302025-12-29T14:22:27+5:30
युती तुटल्याची केवळ औपचारिकता बाकी : भाजपची उमेदवार यादी अंतिम

Sangli Municipal Election 2026: सांगलीत महायुतीमध्ये फूट, राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदेसेना पडली बाहेर
सांगली : राष्ट्रवादीनंतर (अजित पवार) आता महायुतीतून शिंदेसेनाही बाहेर पडण्याच्या वाटेवर असून केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाची तयारी केली आहे. त्यात भाजपने उमेदवारांची यादी अंतिम केली असून संभाव्य उमेदवारांना अर्ज भरण्याचा निरोप देण्यात आला आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रविवारी रात्रीही सुरू होते. या नव्या आघाडीचे भवितव्य सोमवारी स्पष्ट होणार आहे.
भाजपने महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती पण राष्ट्रवादीने (अजित पवार) पहिल्यापासून सवता सुभा मांडला होता. त्यात आता शिंदेसेनेसोबतही युतीचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. शिंदेसेनेला जागावाटपाबाबत भाजपकडून कोणताच ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला नाही. त्यामुळे आता शिंदे सेनेने स्वबळाची तयारी चालविली आहे. भाजपने मात्र चार दिवसांच्या ताणाताणीनंतर उमेदवार यादीवर शिक्कामोर्तब केले आहे.
एक ते दोन प्रभागातील उमेदवार वगळता इतर सर्व प्रभागांतील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. या यादीतून १० ते १२ माजी नगरसेवकांसह दिग्गज इच्छुकांचा पत्ता कट झाल्याचे समजते. सोमवारी भाजपच्या उमेदवारांना ए बी फाॅर्म दिले जाणार असून त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, भाजपशी युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने महाआघाडीशी चर्चा सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील सांगलीत तळ ठोकून आहेत. महाआघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत रविवारीही मंत्री पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगण्यात आले.