आजकाल मोबाइल हा फक्त बोलण्यासाठी किंवा मेसेज करण्यासाठी वापरला जात नाही. बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत आणि बुकींगपासून खरेदीपर्यंत अनेक गोष्टी मोबाइलवरूनच केल्या जातात. पण या सगळ्यात एक गोष्ट अनेकजण दुर्लक्षित करतात, ती म्हणजे मोबाइलमधील लोकेशन सेटिंग्ज. (Anyone can see your location and private information , change these settings in your mobile phone now)अनेक अॅप्स आपल्या नकळत आपलं लोकेशन सतत वापरत असतात. त्यामुळे आपण कुठे आहोत, कुठे जातो, किती वेळ राहतो याची माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकते.
अनेकदा आपण एखादा फोटो काढतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकतो, तेव्हा त्यात लोकेशनची माहिती आपोआप जोडली जाते. विशेषतः सोशल मीडियावर चेक-इन किंवा लोकेशन टॅग वापरण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे आपण घराबाहेर आहोत, प्रवासात आहोत किंवा सुट्टीसाठी बाहेर गेलो आहोत हे सहज समजू शकतं.
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या माहितीमुळे चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. लोकांनी सोशल मीडियावर आम्ही सुट्टीसाठी बाहेर गेलो, अशा पोस्ट आणि लोकेशन अपडेट्स टाकल्यानंतर चोरट्यांनी घर रिकामं असल्याची माहिती मिळवली आणि घरफोडी केल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट लगेच शेअर करणं किती धोकादायक ठरू शकतं हे लक्षात येतं.
विशेषतः फेसबुक सारख्या सोशल मीडिया अॅप्समध्ये लोकेशनशी संबंधित अनेक सुविधा सुरू असतात. फोटो पोस्ट करताना, स्टोरी टाकताना किंवा चेक-इन करताना आपलं ठिकाण इतरांना दिसू शकतं. काही वेळा अॅपला सतत लोकेशन वापरण्याची परवानगी दिलेली असते. त्यामुळे आपण अॅप वापरत नसतानाही लोकेशन ट्रॅक होऊ शकतं.
मोबाइलमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्ज तपासणे गरजेचे आहे. सर्वप्रथम मोबाइलमधील 'लोकेशन' सेटिंग्जमध्ये जाऊन कोणकोणत्या अॅप्सना लोकेशनची परवानगी दिली आहे हे पाहावं. गरज नसलेल्या अॅप्सची परवानगी बंद करावी. काही अॅप्समध्ये 'Always Allow' हा पर्याय सुरू असतो. तो बंद करून 'While Using the App' किंवा 'Don’t Allow' निवडणं अधिक सुरक्षित ठरू शकतं.
फोटो काढताना अनेक मोबाइलमध्ये फोटोसोबत लोकेशन सेव्ह होतं. ही सुविधा बंद केल्यास फोटो शेअर करताना आपलं ठिकाण इतरांना समजण्याची शक्यता कमी होते. तसेच सोशल मीडियावर लाइव्ह लोकेशन किंवा सतत लोकेशन शेअर करणं टाळावं.
आजच्या डिजिटल जगात गोपनीयता जपणं खूप महत्त्वाचं झालं आहे. थोडी काळजी घेतली आणि मोबाइलमधील काही सेटिंग्ज योग्य पद्धतीने बदलल्या तर आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं शक्य होऊ शकतं. सोशल मीडियावर प्रत्येक क्षण शेअर करण्यापेक्षा सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
