-गरिमा पाटील
प्रत्येक पिढी स्वतःची वेगळी भाषा तयार करत असतेच. तशी सध्या जेन झीची भाषा आहे. त्यात एक शब्द किंवा ट्रेंड सध्या चर्चेत आहे, Retardmaxxing. सुटीचे दिवस असल्याने या शब्दावरचे मिम, विनोदही तारुण्यात चांगलेच चर्चेत आहेत. काहीशी वादग्रस्त बंडखोर अशी छटाही या शब्दाला आहे. मात्र, डिजिटल आयडेंटिटी आणि सगळं कसं चांगलंच चाललं आहे हे दाखवण्याच्या वृत्तीवर हसून टीकाही या शब्दात आहे. (Why do Genz no longer want to be constantly 'connected', what has caused digital boredom?)थोडक्यात, काहीच कामधाम न करता अतिच विचार करणं आणि कुठलीही गोष्ट अति करणं यासंदर्भाने हा शब्द ढोबळमानानं वापरता येऊ शकतो. संदर्भ बदलला की त्याच्या अर्थछटाही बदलतात.
परफेक्ट दिसण्यापासून परफेक्ट आयुष्य जगण्याच्या हट्टावरची ही एक जोरदार टीका आहे किंवा त्या वृत्तीलाच विरोध आहे. सतत काहीतरी आकर्षक, प्रॉडक्टिव्ह, यशस्वी करत राहण्याचा ताण नाकारणारं तारुण्य आता हा शब्द वापरते आहे. अनेकांना या ताणातून बाहेर पडायचं आहे, शांतपणे जगायचं आहे. काहींना अतिविचारबिचार न करता कृती करून मनात येईल ते करून पाहायचं आहे. आपलं भविष्यात कसं होईल याची काळजी करत निर्णय न घेता फक्त विचार करण्यालाही नकार आहे. बेधडक होऊन जगण्याकडे कलही आहे.
स्टेटस, अल्गोरिदम, अमूकच पद्धतीने जगण्याचं प्रेशर, सतत डिजिटली कनेक्ट राहण्याचा ताण हे सारं झुकारण्यासाठीही हा शब्द आहे. म्हणायला तो डिजिटल स्लँग आहे, पण त्या जगाचा कंटाळा येत असल्याचं सांगणारा नवा जेन झी ट्रेंडही आहे.
शब्द अवघड वाटत असला तरी अनेकांना हे डिजिटल बांधलेपणच आता नकोसे होऊ लागले आहे. कनेक्ट असलेली दोर गळ्यातला पट्टा होऊ लागल्याची भीती आहे.
तारुण्याच्या बदलत्या मनोवृत्तीचं हे एक लहानसं बंडखोर चित्र आहे.
