चायनीज भेळ हा भारतातील अतिशय लोकप्रिय आणि हटके स्ट्रीट फूड प्रकार आहे. भारतीय चव आणि चायनीज फ्लेवर यांचे भन्नाट मिश्रण म्हणजे चायनीज भेळ. कुरकुरीत तळलेले नूडल्स, भाज्या, मसालेदार सॉस आणि तिखट-आंबट चव यामुळे हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा झाला आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ पारंपरिक चायनीज खाद्यपदार्थ नसून भारतीयांनी तयार केलेला एक फ्युजन फूड प्रकार आहे.(The perfect recipe for Chinese bhel , try making this way, tasty and instant snacks ) रस्त्याच्याकडेला असलेल्या फूड स्टॉलपासून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र चायनीज भेळ मिळताना दिसते. तिचा मसालेदार स्वाद आणि कुरकुरीत टेक्स्चर यामुळे ती खाण्याची मजा वेगळीच असते. एकेकाळी कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मित्रमंडळींचा पहिला मोर्चा चायनीज भेळच्या गाडीकडेच वळायचा. गप्पा, हशा आणि हातात गरमागरम चायनीज भेळ हे अनेक तरुणांच्या कॉलेज जीवनातील खास आठवणींचा भाग झाले. कमी पैशांत पोटभर आणि चविष्ट काहीतरी खायला मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तिची लोकप्रियता खूप वाढली. ही भेळ घरी करणे अगदी सोपे आहे. पाहा रेसिपी.
साहित्य
नुडल्स, शेजवान चटणी, मीठ, पाणी, तेल, कोबी, गाजर, सिमला मिरची, टोमॅटो सॉस, कांदा, सोया सॉस
कृती
१. नुडल्स करण्यासाठी ज्या कच्च्या नुडल्स वापरता त्याच घ्यायच्या. एका खोलगट पातेल्यात पाणी गरम करायचे. त्यात मीठ घालायचे. नुडल्स घालायच्या आणि उकळून घ्यायच्या. शिजल्या की फुलतात आणि मऊ होतात. मग त्यातील पाणी काढून टाकायचं. गार करायचे.
२. त्याला तेल लावायचे. आणि मोकळ्या करुन ठेवायच्या. एका कढईत तेल तापवायचे. त्यात नुडल्स तळून घ्यायच्या. छान कुरकुरीत होतात. मग हाताने तोडून त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करायचे. जास्त चुरा करु नका. आकाराला लांबच ठेवा.
३. कांदा छान लांबट चिरुन घ्यायचा. तसेच सिमला मिरीचीही पातळ आणि लांब चिरायची. गाजर सोलून घ्यायचे आणि बारीक पातळ लांब काप करायचे. कोबी किसून घ्यायचा. छान पातळ किसायचा.
४. कढईत तेल गरम करायचे. त्यात कांदा घालायचा. तसेच सिमला मिरची घालायची आणि गाजरही घालायचे. भाज्या अगदी दोन मिनिटे परतून घ्यायच्या. जास्त नाही अगदी कमी. एका पातेल्यात नुडल्स घ्यायच्या. त्यात भाज्या घालायच्या. थोडा सोया सॉस घालायचा. आवडीनुसार शेजवान चटणी घालायची. तसेच अगदी थोडा टोमॅटो सॉस घालायचा. सगळं छान एकजीव करायचे.
