उन्हाळ्यात फार काही जेवण्याची इच्छा होत नाही. तसेच स्वयंपाकघरात जास्त वेळ काम करण्याचीही इच्छा होत नाही. अशा वेळी झटपट करता येणारे काही पदार्थ असतात. जे चवीलाही छान असतात आणि करायलाही काही मिनिटेच लागतात. (Summer Special Recipe: Make curd sago in five minutes, cool for stomach )असाच एक पदार्थ म्हणजे दही साबुदाणा. करायला सोपा आहे आणि पोटाला थंडावा देणारा आहे. पाहा कसा करायचा.
साहित्य
साबुदाणा, दही, हिरवी मिरची, जिरे, साखर, मीठ, कोथिंबीर, बटाटा, तूप
कृती
१. सर्वात आधी साबुदाणा स्वच्छ धुऊन ४ ते ५ तास भिजत ठेवावा. साबुदाणा मोकळा आणि फुललेला झाला की तो वापरण्यास तयार होतो. एका पॅनमध्ये थोडे तूप गरम करुन घ्यायचे. तूप छान तापल्यावर त्यात जिरं घालायचं. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं फुलल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे.
२. बटाटे उकडून घ्यायचे. जास्त नाही एखादा बटाटा बास होतो. बटाटा उकडल्यावर गार करायचा आणि त्याची सालं काढून घ्यायची. त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करायचे आणि ते फोडणीत घालून हलके परतून घ्यायचे. खमंग होऊ द्यायचे.
३. आता त्यात भिजवलेला साबुदाणा घालून हलक्या हाताने ढवळा. साबुदाणा पारदर्शक दिसू लागला की गॅस बंद करावा. दुसऱ्या भांड्यात दही चांगले फेटून घ्या. दही जरा घट्ट झाल्यावर त्यात मीठ आणि थोडी साखर घाला. नंतर तयार साबुदाणा दह्यात मिसळून नीट ढवळून घ्यायचे. छान ताजी कोथिंबीर आणायची आणि बारीक चिरुन घ्यायची. मिश्रणात वरुन ही कोथिंबीर घाला.
४.हा पदार्थ थंड खायलाही चांगला लागतो. फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर खा. काही जण त्यात शेंगदाण्याचे कुटही घालतात, त्यामुळे चव आणखी छान लागते. दही साबुदाणा हा जास्त तिखट नसल्यामुळे लहान मुलांनाही आवडू शकतो.
साबुदाण्यामध्ये ऊर्जा देणारे घटक असतात, तर दह्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते. त्यामुळे उपवासात किंवा हलके काही खायची इच्छा असेल तेव्हा हा पदार्थ चांगला पर्याय ठरू शकतो.
