उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम आणि आंब्याच्या गोड चवीशिवाय हा सिझन अपूर्णच वाटतो. या ऋतूंत घरोघरी आंब्याचा पल्प वापरून विविध पदार्थ बनवले जातात. उन्हाळ्यात आंब्याच्या पल्पपासून बनवलेल्या पदार्थांची सर कशालाच येत नाही. आंब्यापासून बनवलेले आमरस, श्रीखंड किंवा वड्या आपण नेहमीच आवडीने खातो. परंतु आंब्याचा दाणेदार पल्प आणि भाजलेला रवा यांचे गोड, चविष्ट लाडू म्हणजे सुखं... रव्याचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो, पण त्याला आंब्याचा नैसर्गिक स्वाद आणि पिवळाधमक रंग मिळाला की त्याची चव कैक पटीने वाढते. दिसायला अतिशय आकर्षक आणि खायला तितकेच मऊसूत लागणारे हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विशेष आवडतात(How To Make Mango-Rava Ladoo At Home).
रव्याच्या लाडूंना आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि सुगंध मिळाला, की हा पारंपरिक पदार्थ एकदम खास बनतो. कमी साहित्यांत आणि सोप्या पद्धतीने तयार होणारे हे आंब्याचा पल्प आणि रव्याचे लाडू कोणत्याही प्रसंगी गोडाचा आनंद वाढवणारे ठरतात. नैसर्गिक रंग, आंब्याचा मंद सुगंध आणि रव्याचा दाणेदारपणा यामुळे हे लाडू कोणत्याही महागड्या मिठाईला मागे टाकतील. कोणताही कृत्रिम रंग न वापरता केवळ आंब्याच्या रसाने तयार होणारे हे लाडू आरोग्यदायी आणि चविष्ट (Mango-Rava Ladoo Recipe) कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आंब्याच्या पल्प - २ कप
२. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
३. बारीक रवा - २ कप
४. किसलेलं ओलं खोबरं - १/२ कप
५. मिल्क पावडर - २ टेबलस्पून
६. खडीसाखरेची पावडर / पिठीसाखर - २ ते ४ टेबलस्पून
७. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
८. काजू , मनुका इतर ड्रायफ्रूट - १/२ कप (तेलात तळून घेतलेले)
शेवग्याच्या शेंगांचं भरीत करा आणि खा चमचमीत पौष्टिक पदार्थ, गावरान चवीचा ठसका - पाहा रेसिपी...
अस्सल गावरान चवीचं, भरपूर कांदा घातलेलं 'इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ' कसं करायचं, पाहा रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून त्यांचा पल्प काढून घ्यावा.
२. एका मोठ्या खोलगट कढईमध्ये साजूक तूप घेऊन त्यात बारीक रवा घालूंन तो खरपूस आणि हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा.
३. रवा भाजून झाल्यावर त्यात थोडं ओलं किसलेलं खोबरं घालावं. मग रवा आणि खोबरं एकजीव करून साजूक तुपात चांगलं परतवून घ्यावं.
४. त्यानंतर या रवा आणि खोबऱ्याच्या मिश्रणात आंब्याचा पल्प घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. सगळ्यात शेवटी या मिश्रणात मिल्क पावडर घालून लाडूचे मिश्रण तयार करून घ्यावे.
५. गॅस बंद करून तयार मिश्रण एका मोठ्या परातीत काढून त्यात खडीसाखरेची पावडर किंवा पिठीसाखर दोघांपैकी एक चवीनुसार घालावे. सोबत हलकेच
तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स किंवा काजू, मनुका आणि वेलीची पूड घालावी. सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावेत.
६. तयार मिश्रणाचे गोलाकार लाडू वळून घ्यावेत.
आंब्याचा पल्प आणि रव्याचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.
